जळगाव : ज्ञानोबा – तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी हा प्रमाणग्रंथ देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. तसेच अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राच्या संत परंपरेने केले, मी दरवर्षी आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेत असतो. पांडुरंगाच्याच कृपाप्रसादाने आज ५४ बसेसद्वारे जिल्ह्यातील वारकर्यांची वारीची व विठ्ठलदर्शनाची व्यवस्था करता आली हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकरी, कीर्तनकार व भाविक भक्तांशी संवाद साधतांना केले.
कीर्तनकारांच्या पायलट बसमधे काही अंतर उभ्याने प्रवास करून ना. गुलाबराव पाटील यांनी वारकर्यांना शुभेच्छा दिल्या. भरपूर पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाला केली. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव ग्रामीण मतदार संघातील चार हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांसाठी आषाढी वारीनिमित्त पंढरपूर जाण्यासाठी ५४ मोफत बसेस, खाजगी वाहनासह भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
ना. गुलाबराव पाटील व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या बसेसला हिरवा झेंडी दाखविण्यात आली. वारकऱ्यांना रवाना करण्यापूर्वी गुलाबराव पाटील भक्ती रंगात रंगले. त्यांनी कीर्तनकारांसोबत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांसोबत चक्क फुगडी देखील खेळली. यावेळी प्रतापराव पाटील देखील भक्तीरसात तल्लीन झाल्याचे दिसून आले. विठू नामाचा जय घोषाने पाळधी नगरी दुमदुमली होती..
विशेष बसेसद्वारे स्वखर्चाने भाविकांना पंढरपूर वारी घडवणारा हा पहिलाच प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व वारकरी ना. गुलाबभाऊंना धन्यवाद देत होते. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे – माळी उपजिल्हाप्रमुख पी.एम पाटील सर, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
लालपरी वारीचे होत आहे कौतुक
या बस वारीचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जीपीएस मित्र परिवार यांनी केले असून प्रत्येक वारकर्याचा विमा घेण्यात आला आहे. बस वारीत पायलट बस कीर्तनकार महाराजांसाठी सजवण्यात आली होती. तिचे नेतृत्व श्रीगुरु मोठेबाबा वारकरी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोप्रेमी हभप गजानन महाराज यांचे सह ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प. प्रा.चत्रभूज महाराज,, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. कैलास महाराज कोंढावळकर, ह.भ.प. ईश्वरलालजी महाराज यांचेसह जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार करीत आहेत. या लालपरी (बस) वारीचे सर्वत्र कौतुक आहे.
असा आहे बस वारीचा दिन क्रम
नामस्मरण, भजनाचा आनंद घेत सर्व वारकरी दि.२५ जून रोजी पंढरपूरला पोचतील. चंद्रभागास्नान, पांडुरंगाचे दर्शन, नगर प्रदक्षिणा करुन शेगावा दुमालास्थित गोविंद महाराज मठात मुक्कामी येतील. तेथे रात्री हरिकीर्तन होईल. दि.२६ ला देखिल हरिकीर्तन व भोजन प्रसाद घेऊन परतीचा प्रवास करतील.