Rajnath Singh : कारगिल दिनी पाकवर टीकास्त्र, म्हणाले ‘त्या युद्धाच्यावेळी आम्ही…’

Rajnath Singh : cross LOC त्या युद्धाच्यावेळी आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर याचा अर्थ आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू शकलो नाही असा होत नाही, आम्ही एलओसी ओलांडू शकतो आणि गरज पडल्यास भविष्यात एलओसी ओलांडू असे टीकास्त्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.

देश आज 24 वा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करत असून द्रासच्या मुख्य कार्यक्रमात ते संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

हा विशेष दिवस देशाच्या त्या शूर सुपुत्रांना समर्पित आहे, ज्यांनी २६ जुलै १९९९ रोजी सर्व अडचणींवर मात करत पाकिस्तानी सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावत दुर्गम शिखरांवर भारताचा तिरंगा फडकावला.

संरक्षण मंत्री म्हणाले की 26 जुलै 1999 रोजी युद्ध जिंकल्यानंतरही जर आमच्या सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर त्याचे कारण म्हणजे आम्ही शांतताप्रिय आहोत. आमचा भारतीय मूल्यांवर विश्वास आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधिलकी आहे, पण याचा अर्थ आम्ही नियंत्रण रेखा ओलांडू शकत नाही असा नाही. गरज पडल्यास शत्रूंचा पाठलाग करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.

राजनाथ सिंह म्हणाले की, कारगिल युद्धातून आपण संपूर्ण जगाला आपल्या ताकदीचा संदेश दिला होता. ते म्हणाले की, जेव्हा आमच्या राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा आमचे सैन्य कोणत्याही किंमतीत मागे हटणार नाही. ते म्हणाले की आजही आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत मग शत्रू कोणीही असो.