लोकायुक्ताकडून भ्रष्टाचारमुक्तीकडे

केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन लोकायुक्त कायदा करण्यात येत आहे. या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही असेल. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा या नवीन लोकायुक्त कायद्याचा भाग असेल. राज्य सरकारच्या परवानगीविना Lokayukta  लोकायुक्त पोलिसात गुन्हा दाखल करू शकतील. या विधेयकाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली. फडणवीसांनी शब्द पाळला तर नागपूर अधिवेशनाची महाराष्ट्राला ही मोठी देणगी असेल. नागपूर अधिवेशनात काही होत नाही; फक्त हुरडा पार्ट्या होतात, फक्त गोंधळ होतो, असा लोकांचा अनुभव आहे. यावेळी मात्र लोकांना सुखद धक्का मिळणार आहे. अनेकांना कल्पना नाही, पण फार मोठे काम शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे. ध्येयवादी माणसेच असा लोकहिताचा निर्णय घेऊ शकतात, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. अण्णांचे वय आज 85 वर्षे आहे. त्यांनी 11 वर्षांपूर्वी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून निर्माण झालेल्या जनजागरणामुळे मोदी सरकार आले. देशाला लोकपाल मिळाला. राज्यातही अशा सशक्त लोकायुक्ताची गरज होती.

ती आता पूर्ण होत आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्याला मोठे बळ मिळणार आहे. माहिती मिळविण्याच्या अधिकाराचे मोठे हत्यार सामान्य माणसाच्या हाती आहे. त्या लढ्याच्या पुढचे हे पाऊल आहे; पण हे सहजासहजी झालेले नाही. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. सहा महिन्यांपूर्वी सत्तेत येताच फडणवीस यांनी या समितीला चालना दिली आणि रिझल्ट आपण पाहतो आहोत. या Lokayukta लोकायुक्ताला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा दर्जा आहे. आधीचे लोकायुक्त नामधारी असायचे. मुख्यमंत्री त्याला निवडायचे. त्याला फारसे अधिकारही नव्हते. भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करताना त्याला मर्यादा पडायच्या. नवीन व्यवस्थेतला लोकायुक्त थेट ज्येष्ठ न्यायमूर्ती राहणार असल्याने त्याने दबावात काम करण्याचा प्रश्न नाही. त्याला कोणाच्या परवानगीचीही गरज नसेल. तक्रारीत दम असेल तर तो थेट चौकशी आणि पुढची कारवाई करू शकतो. एक लक्षात घ्या. कठोर कायदे केले म्हणजे भ्रष्टाचार गाडला जाईल, अशातला भाग नाही. भ्रष्टाचार ही मानसिक प्रवृत्ती आहे. आजही कायदे आहेत. तरीही हर्षद मेहता, नीरव मोदी यांसारखे घोटाळेबाज निघतातच. कायदे येतात तशा पळवाटाही येतात. समाजात पुण्य वाढले तसे पापही वाढलेले आपण पाहतो. लावण्यांनी समाज बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारलाही नाही. शेवटी हा समाज आहे.
जसे लोक, तसा समाज. व्यवस्था परिवर्तन ही खरी समस्या आहे. जनतेच्या मानसिक परिवर्तनाने हे घडू शकते. नवीन लोकायुक्त कायद्याने तशी सकारात्मक मानसिकता तयार व्हायला मदत मिळेल, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? यापुढे पैसे खाताना कोणी बडा अधिकारी किंवा कोणी मंत्री हजार वेळा विचार करेल. Lokayukta  लोकायुक्ताचा हा धाकच निम्मी लढाई फत्ते करून जातो. आधी धाकच नव्हता. ठेक्यांमध्येही आता मलाईची सोय नाही. एकही तक्रार आली तर त्या ठेकेदाराचा खेळ खल्लास. पूर्वी मंत्र्याविरोधात तक्रार केली तर त्याच्या चौकशीची परवानगी अवघड काम होते. लाख तक्रारी होऊनही काही मंत्र्यांचा बाल वाकडा झाला नाही, अशी उदाहरणे शेकड्याने सापडतील. अण्णांच्या आंदोलनातून उदयाला आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन घोटाळ्याच्या आरोपात तुरुंगात आहे. क्रांती स्वतःची पिल्ले खाते असे म्हणतात, ते असे. दिल्लीचे सोडा; आपल्याकडचे दोन माजी मंत्रीही तुरुंगात आहेत. पूर्ण व्यवस्था सडली आहे. मोठे ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी आता मोकळे आकाश आहे.

सामान्य माणसांना भ्रष्टाचार आवडत नाही. त्यांना पारदर्शकता हवी आहे. मात्र त्यासाठी ते झगडायला तयार नसतात. कोणी राजकारणी तशी व्यवस्था करेल असे लोकांना वाटते. भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांमध्ये खदखद आहे. खदखद होती म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदी यांना देशाची सत्ता दिली. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ हा मोदींचा तेव्हा नारा होता आणि आजही आहे. ही लढाई सोपी नाही. गावापासून महानगरापर्यंत कट-कमिशनची कामे सुरू असतात. या सार्‍यांना आता ब्रेक लागणार आहे. प्रशासनात खर्‍या अर्थाने पारदर्शकता येणार आहे. पारदर्शकतेचे हे पहाटस्वप्न पाहायला महाराष्ट्र आतुर आहे. पण हे कसे व्हायचे? पण कोणाला रस आहे?

 

मोठे चमत्कारिक आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टार्गेट करीत होते. नंतर कर्नाटक सीमावादावर उतरले. आता अचानक कुठला तरी विषय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे लागले. नागपूरचे अधिवेशन म्हणजे कुठल्याही सरकारला टेन्शन येते. त्याला कारण आहे. नागपूरलाच अनेक सरकारांचे कपडे फाटले आहेत. मुंबईतील मोर्चानंतर महाआघाडी नागपुरात आक्रमक होईल असे वाटले होते. मात्र, महाआघाडीची एकूणच रणनीती बुचकळ्यात टाकणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रथमच मोठा आरोप झाला. शिंदे यांनी स्वस्तात भूखंड दिल्याचा आरोप करून ठाकरे गटाने सनसनाटी निर्माण केली खरी. मुख्यमंत्र्याच्या खुलाशानंतरही शिवसेना ठाकरे गट हा मुद्दा लावून धरत आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते अजित पवार फारसे आव्हान देताना दिसत नाहीत. उलट दोन्ही काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याची खमंग चर्चा कानावर येते. शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात केले होते. मात्र, एकूण हवा पाहिली तर उलटे होण्याची शक्यता आहे. उद्धव यांची शिवसेना आता शिल्लक सेना झाली आहे. 16 आमदार उरले आहेत. फेब्रुवारीत महापालिका निवडणुका आहेत. त्या काळात यातले काही आमदार बाहेर पडतील. शिंदे सरकार दिवसेंदिवस भक्कम होत जाणार आहे. 2024 मध्ये नवा इतिहास लिहिला जाईल तो भाग वेगळा.

 

 –  मोरेश्वर बडगे

– 9850304123

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)