---Advertisement---
जळगाव : नागझिरीसारख्या २० घरांच्या छोट्याशा पाड्यावर, दारिद्र्य, सालदाराची परंपरा आणि घरातील भांडणांच्या अंधारात वाढलेला तरुणः जिद्द मात्र पर्वताएवढी. हा तरुण म्हणजे शंकर भिल. आज तो अमेरिकेतील सॅन दिएगो येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात विद्यावाचस्पती पदवी मिळविण्यासाठी निघाला आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा प्रवास केवळ शंकरचा नाही; तो संपूर्ण आदिवासी समाजासाठी उभा झालेला आशेचा उज्ज्वल दीप आहे.
जळगाव तालुक्यातील नागझिरी या अवघ्या २० घरांच्या छोट्या गावात सालदारी करणाऱ्या भिल्ल आदिवासी समाजातील कुटुंबात शंकर भिल यांचा जन्म झाला. घरात आर्थिक दारिद्र्य, वडिलांचे दारूचे व्यसन, सतत कलह आणि अनिश्चितता, अशा कठीण परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. तरीही शिक्षणावरची निष्ठा आणि आईची जिद्द यांनी शंकरचा मार्ग बदलून टाकला.
लहानपणापासूनच गंगापुरी (ता. जामनेर) येथील आदिवासी आश्रमशाळेत निवासी शिक्षण सुरू झाले. शंकरने दहावीत ८८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम स्थान पटकाविले. मात्र, या यशाच्या आनंदातच काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. तरीही आईने दुःखाच्या छाताडावर दगड ठेवत दुसन्याच दिवशी मुलाला समाजकल्याण वसतिगृहात प्रवेश दिला, ‘शिक्षण थांबू देणार नाहीं’ ही तिची हट्टी जिद्द.
पुणे येथील फर्ग्यूसन महाविद्यालयात बी. ए.ला प्रवेश मिळाल्यानंतर शंकरला जग विस्तृत दिसू लागले. हडपसरच्या आदिवासी वसतिगृहात राहून त्याने समाजशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. गावात नेटवर्क नसणे, लॉकडाउन, रिचार्जसाठी पैशांची कमतरता, अशा अडचणींमुळे एम. ए समाजशास्त्रचे शिक्षण अडखळले; पण शंकर थांबला नाही. अचानक मिळालेल्या संधीने त्याच्या आयुष्याने वळण घेतले. फर्ग्युसन महाविद्यालयातील एका मित्राने ‘अझीम प्रेमजी विद्यापीठा’ची माहिती दिली. शंकरने प्रवेश परीक्षा दिली आणि एम. ए. डेव्हलपमेंटला प्रवेश मिळताच पूर्ण शिष्यवृत्तीही मिळाली, राहणे, जेवण, शुल्क सर्वकाही त्यातून भागले. सुरुवातीला इंग्रजी माध्यमाची भीती होती; पण शिक्षक, मित्र आणि सततची मेहनत याने ती अडचणही पार केली.
याच काळात ‘बहुजन इकॉनॉमिस्ट्स’ या व्यासपीठातून त्याला एक मेंटॉर मिळाली, यूएसएमध्ये पीएच. डी. करणारी विद्यार्थिनी. तिने विद्यापीठ निवडण्यापासून एसओपी एडिट करण्यापर्यंत मदत केली. शंकरची आर्थिक परिस्थिती बघून अर्जप्रक्रियेदरम्यान काही वेळा आर्थिक सहाय्यही केले. या पाठिंब्याने शंकरचे पाय अधिक भक्कम झाले.
आदिवासी समाजातील जमीन, इतिहास, विस्थापन यांसारख्या दुर्लक्षित प्रश्नांवर संशोधन करायचे, हे शंकरचे ध्येय अधिक दृढ झाले. “समुदायाच्या वेदनांना शैक्षणिक आवाज द्यायचा” ही भावना मनात ठेवून शंकरने पीएच. डी. साठी अर्ज केले आणि अखेर सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील इथनिक स्टडीज विभागात त्याची निवड झाली.









