संघ विचारातून आयुष्यात घडत गेलो!

अतुल जहागीरदार

शेंदुर्णी : शेंदुणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे संघ विचाारातून घडत गेलो. त्या संस्काराच्या बळावरच यशाचे शिखर गाठता आल्याचे प्रतिपादन जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.सुरेद्र काबरा यांनी केले. नियुक्तीनंतर त्यांनी तरूण भारतला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.

अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांची शासनाने नुकतीच जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी प्रथम ‘तरूण भारत’ कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे सर्जना मिडिया सोल्युशन्स प्रा.लि. चे कार्यकारी संचालक रविंद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी व कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मोहन देशपांडे, अ‍ॅड. प्रदीप महाजन उपस्थित होते.

यावेळी बोलताना अ‍ॅड. काबरा म्हणाले, माझा मोठा भाऊ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पुर्ण वेळ कार्यकर्ता होता. त्यामुळे त्या काळातील परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या संपकार्त आलो.बालस्वयंसेवक असताना त्याकाळात शाम जाजू, चंद्रकांतदादा पाटील, राजेश पांडे यांच्याशीही संपर्क आला आणि घडत गेलो. सुनिल लोढा हे परिषदेत मंत्री होते, त्याचवेळी मी विद्यार्थी परिषदेचा सहमंत्री म्हणून कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी मशाल मोर्चा, 370 कलम आदी विषयांवरील आंदोलनात स्रक्रिय सहभाग नोंदविला. दिलीप दादा पाटील यांचाही सहवास वेळोवेळी लाभल्याने संघ विचाराची पेरणी अधिक घट्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयातील वाद-विवाद स्पर्धेतून वकिलीची प्रेरणा

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना वाद विवाद स्पर्धा होत असत. त्यात नेहमीच सहभाग घ्यायचो. त्यातूनच वकीली करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अ‍ॅड.सुरेद्र काबरा यांनी सांगितले. व्यापार सांभाळून शिक्षण घेतले. लोकहितवादी मंडळ, पुण्याचे भंडारी वाद-विवाद स्पर्धा घेत होतो. त्यामुळे शेरु काझी, बंकट काबरा आमची टीम महाविद्यलयात असतांना तयार झाली होती. त्यातून खंडन -मंडन आदी विषयाचा चांगला अभ्यास झाला. त्यातूनच वकिली करण्याचे ठरल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शैक्षणिक प्रवास…

शेंदुर्णीत चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षणाची सुरूवात झाली. पाचवी ते दहावीपर्यंत शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या गरुड विद्यालयात पदवीपर्यंचे शिक्षण घेतले. त्यानंतर मण्यार लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पुर्ण केल्याचे काबरा यांनी सांगितले. जि.प.च्या शाळांमध्ये त्याकाळातील शिक्षण पध्दती अत्यंंत चांगल्या प्रकारची होती, असेही त्यांनी म्हटले.

प्रत्येक क्षेत्रात गुरू आवश्यक ..

प्रत्येक क्षेत्रात गुरू चांगला गुरू आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अ‍ॅड.श्रीकांत भुसारी यांच्यासारखे सिनियर मिळाल्याने वकिलीची चांगली प्रॅक्टीस करता आली. आयुष्यात सिनियर चांगले मिळणे महत्वाचे असल्याचे अ‍ॅड.काबरा यांनी सांगितले. अ‍ॅड.भुसारी यांच्याकडे दिवाणी, फौजदारी दोन्ही शिकता आले. खेडे गावात दोन्ही विषय आवश्यक असल्याने त्यांच्याकडे मी अनुभवातून या बाबी आत्मसात करू शकलो. त्यामुळे माझ्या 28 वर्षांच्या प्रॅक्टीसमध्ये या क्षेत्रातील जडणघडणीत अ‍ॅड.भुसारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तमराव थोरात ‘संघात’ चेतना निर्माण करणारे व्यक्तीमत्व

शेंदुर्णीतील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात माझ्या वडिलांकडे नेहमी येत असत. याला दुकानत अडकवू नका असे ते सांगत असत. हा तळ हाताने झाकला जाणारा सुर्य नाही, असे ते नेहमी माझ्या वडिलांना बोलत असत. तसेच घरच्याशी वेळप्रसंगी याविषयावर भांडायचे. चार वर्ष दुकानदारीचा व्यवसाय केला. मात्र त्यात मन लागत नव्हते. त्यातच उत्तमराव थोरात म्हणजे शेंदुर्णीत संघात चेतना आणणारे व्यक्तीमत्व आहे. उत्तमराव थोरात म्हणजे मेलेल्या प्राण्यात जीव ओतण्याची ताकद असलेला माणूस आहे. त्यांच्याकडील असलेल्या अफाट शब्द भांडाराने ते संघाला प्रेरणा देण्याचे मौलिक कार्य कार्य ते करीत असल्याचे अ‍ॅड.काबरा यांनी सांगितले.

अधिकार्‍यांची होणार कार्यशाळा

गुन्हेगारांना फायदा होऊ नये यासाठी कामातील चुका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याशी अधिकार्‍यांची कार्यशाळा घेण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शासन मोठा पक्षकार आहे. न्यायालयात शासनाची बाजू कमकुवत राहू नये यासाठी कायदेशीर मुद्दावर चर्चा होणार असल्याचे अ‍ॅड.काबरा यांनी सांगितले. गुन्हे दाखल करतांना तपासणी अधिकार्‍यांनी काही पैलूची तपासणी करणे आवश्यक असून त्यासाठी ही कार्यशाळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.