Nandurbar Crime News : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सात आरोपींना अटक

नंदुरबार : नंदुरबार गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान मोठी कारवाई करत नवापूर तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सात आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीने जिल्ह्यातील तळोदा, विसरवाडी, नंदुरबार तसेच जिल्ह्याबाहेरून अनेक दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल १९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्याची एकूण किंमत ९ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. या टोळीच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून आरोपींना पुढील तपासासाठी नंदुरबार तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सात आरोपींना अटक, एक पसार

विसरवाडी हद्दीतील बिज्यादेवी येथून राकेश दिलवर कोकणी (२३, रा. बिजादेवी, ता. नवापूर) आणि शशिकांत कौतिक कोकणी (२६, बिजादेवी, ता. नवापूर) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी अरविंद जगदीश कोकणी (२२, नवापूर, जि. नंदुरबार), नीलेश हसीराम कोकणी (२४, नवापूर, जि. नंदुरबार), अनमोल ऊर्फ दादू विलास गावित (२८, रा. शेगवे, ता. नवापूर), प्रदीप राजू कोकणी (२६, जि. नंदुरबार) आणि अल्प दरात दुचाकी खरेदी करणारा रोहिदास मोतीराम भोई (२२, जि. नाशिक) यांना अटक केली आहे. मात्र, लखन ऊर्फ लक्ष्मण अशोक वळवी (रा. बिजादेवी, ता. नवापूर) हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

गुन्ह्याचा शोध कसा लागला?

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दिलीप कोकणी (रा. कळंबा, ता. नंदुरबार) यांच्या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना विसरवाडी हद्दीतील बिजादेवी गावातील काही व्यक्ती दुचाकी चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

या कारवाईत नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, राकेश वसावे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, मोहन ढमढेरे, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण आदींनी विशेष मेहनत घेतली.