‘जया शेट्टी हत्याकांडात’ गँगस्टर छोटा राजनला जामीन मंजूर, जन्मठेपेलाही दिली स्थगिती

#image_title

Jaya Shetty murder case: जया शेट्टी हत्याकांडातील गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

न्यायालयाने बुधवारी राजनच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत ​​या प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, राजनला आणखी एका खटल्यात तुरुंगातच राहाव लागणार आहे. जया शेट्टी या मध्य मुंबईतील गमदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. मुंबईतील मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमएम पाटील यांनी राजनला दोषी ठरवले होते.

काय होते प्रकरण ?
2001 मध्ये, जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने ग्रँट रोडवरील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये राजनच्या गुंडांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. राजन टोळीने रवी पुजारीच्या माध्यमातून जया शेट्टी यांच्याकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचवेळी, नुकताच छोटा राजनला दोषी घोषित करण्यात आले. त्याला इंडोनेशियामध्ये अटक करून ऑक्टोबर 2015 मध्ये भारतात आणण्यात आले. तेव्हापासून तो तिहार, नवी दिल्ली येथील तुरुंग क्रमांक दोनमध्ये होते. एकेकाळी दाऊद इब्राहिमच्या जवळचा असलेला छोटा राजन 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद टोळीपासून वेगळा झाला होता.