भुसावळ : जळगाव गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आयशर वाहनातून 60 लाखांचा गांजा जप्त केला असून पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच संशयीत मात्र महामार्गावर वाहन सोडून पसार झाले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ट्रामा केअर सेंटरजवळ ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच चाळीसगावात 60 लाखांचा गुटखा पकडण्यात आला व त्यानंतर दोन दिवसांनी भुसावळात तब्बल 60 लाखांचा गांजा पकडण्यात आल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांच्या गोटात भीती पसरली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्यानंतर गोपनीय माहितीनंतर राष्ट्रीय महामार्गावर एलसीबी व बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचत ट्रामा केअर सेंटर पुढे असलेल्या पेट्रोल पंपाच्या अलिकडे आयशर गाडी (एम.एच.15 एच.एच.6994) बेवारसरीत्या उभी असताना ताब्यात घेतली मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने रस्त्यावर वाहन सोडून संशयीत पसार झाले. आयशर वाहनात इलेक्ट्रीक साहित्य, लोखंडी अँगल, लाईटींग, ट्युुबलाईट, प्लॉयऊड असे साहित्य होते व त्याआडे तब्बल 16 पोते गांजाची वाहतूक होत असल्याचे दिसून आले.
मालेगावात आवळल्या चालकाच्या मुसक्या
आयशर वाहनाच्या तपासणीदरत्यान त्यात मिळालेल्या डायरीत चालकाचा क्रमांक होता व त्याआधारे तांत्रिक विश्लेषणाअंती एलसीबीचे उपनिरीक्षक गणेश चौबे, सचिन महाजन, अक्रम शेख, प्रमोद लाड वंजारी यांच्या पथकाने या गाडीचा चालक प्रकाश कोसोदे याला मालेगावातून अटक केली तर गाडी मालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. गांजा तस्करीत मोठे रॅकेट असल्याचा संशय असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नजन पाटील, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील दामोदरे, वासूदेव मराठे, दीपक पाटील, रणजीत जाधव, मुरलीधर बारी, मोतीलाल चौधरी, किरण धनगर तसेच सहायक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, श्रीकृष्ण देशमुख व प्रमोद धनगर यांच्यासह गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गांजाची मोजणी व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.