धुळे : जिह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवीमध्ये मागील महिन्यात गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला होता. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांची चौघांना अटक केली होती. अशाच प्रकार साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गाव शिवारातील शेतात घडला आहे. यात स्थानिक पोलीस व पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे पिपळनेर पासून ३ किमीदूर असलेल्या देशशिरवाडे गाव शिवारातील शेतात छापा टाकला, या छाप्यात ट्रॅक्टर ट्रॉलीतील तब्बल 1 कोटी 19 लाखांचा गांजा व 6 लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघानाविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर (ता.साक्री) येथील मोहन देवचंद साबळे यांच्या देशशिरवाडे शिवारातील शेतातून गांजा सदृश्य अंमली पदार्थ कोणत्या तरी वाहनातून विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने संयुक्त्तरित्या काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोहन साबळे याच्या शेतात छापा टाकण्यात आला. तेथे पोपट ओंकार बागुल (वय 40 रा.रायकोट ता.साक्री ह.मु.मोहन साबळे यांचे देशशिरवाडे येथील शेतात) हा दिसला. तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉली काळे प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसले. याची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. याचौकशीत बागुल याने हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश्य मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे उघड झाले.
या कारवाईत तब्ब्ल 542.73 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ 18 प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेलाआढळून आला. यासह 6 लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 कोटी 19 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे श्रीराम पवार, प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे सपोनि किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि प्रकाश पाटोल, पोहेकॉ संदिप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, पोकॉ अतुल निकम, कमलेश सुर्यवंशी, राजीव गिते व पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोहेकॉ कांतीलाल अहिरे, पोकॉ दिपक पाटील, भरत बागूल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांनी केली.