अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे भाऊ राजेश अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी मोठा निकाल देत न्यायालयाने त्यांना अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्स मध्ये कथित फेरफार करून ३८८ कोटी रुपयांच्या बाजार नियमन उल्लंघनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
SFIO २०१२ साली अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांवर गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूकीचा आरोप करत आरोपपत्र दाखल केले होते. हे कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित होते. या आरोपपत्रात गौतम अदानी आणि त्यांचा भाऊ राजेश अदानी यांच्यासह १२ जणांची नावे होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मे २०१४ मध्ये गौतम अदानी यांना निर्दोष मुक्त केले होते आणि त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे त्यांच्या निर्णयात म्हटले होते. परंतु एसएफआयओने या आदेशाला आव्हान दिले होते, त्यानंतर, नोव्हेंबर २०१९ मध्ये, सत्र न्यायालयाने आदेश रद्द केला आणि खटला पुन्हा सुरू केला.
गौतम अदानी आणि राजेश अदानी यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.आज सोमवारी, न्यायमूर्ती आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा आढावा घेतला आणि कथित बाजार नियमन उल्लंघनाशी संबंधित सर्व आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केली.