Crime News : गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसासह त्रिकूट जाळ्यात

भुसावळ / धुळे : शहरात गावठी पिस्टलासह जिवंत काडतूसांसह खरेदी विक्री होणार असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. शिरपूरसह गुजरातमधील संशयीत येताच त्यांना अटक करण्यात आली. संशयीताकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतूस, दुचाकी व दोन हजारांची रोकड मिळून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७ रोजी मध्यरात्री १२.५० वाजेच्या सुमारास ही कारवाई धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान फाट्याजवळ करण्यात आली.

या आरोपींना अटक
प्रकाश बारकू पावरा (२३, कणेरी, ता. शिरपूर), आकीब खान शकीब खान (२६, रुद्रपूरा गार्डन कॉलनी, सुरत), मोईन इम्रान चक्कीवाला (१९, ओडी बंगला, मंगला पॅलेस, सुरत, गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयीत पावरा हा खानसह चक्कीवाला यांना बेकायदा शस्त्र विक्री करताना पोलिसांनी सापळा रचून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून ४० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा,चार हजार रुपये किंमतीचे चार जिवंत काडतूस, २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.१८ बी. के.८८३०), दोन हजारांची रोकड मिळून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, संजय पाटील, शरीफ पठाण, पवन गवळी, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार आदींच्या पथकाने केली.