तरुण भारत लाईव्ह । वैभव करवंदकर । नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ज्येष्ठ कन्या खासदार डॉ. हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. तसेच द्वितीय कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. विधानसभा व लोकसभा मतदारसंघावर गावित कुटुंबियांची पकड मजबूत असली तरी आता त्यांच्यापुढे काही आव्हाने उभी राहत आहेत.
नंदुरबार या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1997 मध्ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्यप्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे उदा. खेडदिगर व खेतिया ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत. या जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा हे सहा तालुके येतात. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.
डॉ. विजयकुमार गावित हे 28 वर्षापासून राजकारणात आहे. सन 1995 ला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर हे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री झाले. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासोबत आपले राजकीय क्षेत्र देखील मजबूत केले. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली आहे.
सन 2019 लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार 117 मतदार होते. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांना चांगली मते मिळाली होती. त्यांनी जवळपास 95 हजार 296 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार अॅड़ के. सी. पाडवी यांना 5 लाख 41 हजार 930 तर डॉ हिना गावीत यांना 6 लाख 37 हजार 226 इतकी मते मिळाली आहेत. ह्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये 68.33 टक्के मतदान झाले होते.
महाविकास आघाडीची सत्ता असताना आमदार के. सी. पाडवी यांना काँग्रेस पक्षातर्फे आदिवासी विकास मंत्री पद मिळाले. परंतु पदाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात ते कमी पडले. संधी मिळाली परंतु त्या संधीचे त्यांनी सोने केले नाही. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तसेच नंदुरबार विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच खासदार डॉ.हिना गावित यांना आजतरी सक्षम विरोधक नाही.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षाकडे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याची चाबी रघुवंशी यांच्या हातात होती त्यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडी सोबत त्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी ह्या काँग्रेस पक्षाकडून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या तर शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र अॅड. राम रघुवंशी हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. परंतू महाराष्ट्रात सत्तांतराचे राजकारण सुरू झाल्यानंतर भाजपाने शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यात भाजपाचे डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्री पद मिळाल्याने जिल्हा परिषदेवर देखील पकड मिळवत. त्यांनी अध्यक्षपदी त्यांची द्वितीय कन्या भाजपाकडून डॉ. सुप्रिया गावित तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सुहास नाईक यांची निवड झाली. काँग्रेसच्या सीमा वळवी यांना 25 तर भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित यांना वाढदिवसाचे बॅनर ठरले चर्चेत
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक असलेलेे डॉ. विशाल कुवरसिंग वळवी यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख झाल्याने ते देखील खासदार डॉ. हिना गावित यांच्या विरोधात उभे राहतात का? अशी चर्चा येथे सुरू झाली आहे. पूर्वी सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीला डॉ. सुहास नटावदकर, कुवरसिंग वळवी, नागेश पाडवी यांनी खा. डॉ. हिना गावित यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी घ्यायला लावली होती. परंतू ह्या येणार्या निवडणुकीला परत हे एकत्र येऊन डॉ. गावित कुटुंबापुढे आव्हान उभे करतील, असे बोलले जात आहे.
भेदभावाचा डॉ. गावीत यांच्यावर आरोप
डॉ. गावित कुटुंब भारतीय जनता पार्टीचा नेतृत्वाखाली काम करत आहेत परंतु त्याच पक्षातील शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे शहादा तळोदा मतदारसंघात निधी देतांना भेदभाव करतात. अशाच विविध कारणांवरून डॉ. गावित कुटुंबावर नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टी मधील विशिष्ट गट डॉक्टर गावित कुटुंबाच्या विरुद्ध मोर्चे बांधणी करून आहेत.