तरुण भारत जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील गायत्री महिला बचतगटाने अनोखा प्रयोग केला आहे. बचतगटाने चक्क फळभाज्या निर्जलीकरण प्रकल्प उभारला आहे. या माध्यमातून विविध पदार्थांची पावडर तयार करण्याचा लघू प्रकल्प उभारण्यात आला आहे. गायत्री स्वयंसहाय्यता समूहाच्या उपाध्यक्षा वंदना प्रभाकर पाटील या प्रकल्पाचे संचलन करीत आहेत. तसेच त्यांनी गायत्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचीही स्थापना केली असून त्यांच्या त्या अध्यक्षा आहेत. या कंपनीचे 300 सभासद आहेत. 2 फेब्रुवारी 2014 मध्ये हा बचत गट स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर फार्मर प्रोड्यूसर कंपनीची निर्मितीही करण्यात आली. भविष्यात गायत्रीशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी _ट्रेडिंग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. या समूहाची यशोगाथा घरगुती खाद्यसंस्कृती जपणारी आहेच, पण गटातील वंदना पाटील यांनी कौशल्य पणाला लावून नवतंत्राच्या माध्यमातून नव्याने फळभाज्या निर्जलीकरणाची प्रक्रिया हाती घेतली. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेंतर्गत गायत्री महिला स्वयंसहायता गटाने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
कोरोनाकाळात मास्क शिऊन मिळविले 9 लाखांचे उत्पन्न
सन 2020 मध्ये कोरोना पहिल्या लाटेत बचतगट अडचणीत आला. पण दहाही जणी डगमगल्या नाहीत आणि मास्क उत्पादन सुरू केले. मंदीतही संधी साधून 90 हजार मास्क शिवून 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून उच्चांक गाठला आणि स्वतः सोबतच गावातील 15 महीलांना रोजगार दिला.
सन 2014 मधे दहा महीलांनी एकत्र येऊन गायत्री स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना केली.संकटे पेलण्याची मानसिकता होतीच मनाच्या तळाशी, म्हणून गायत्रीच्या लेकींनी पदरगाठ बांधली आणि अनेक अडचणीवर मात करून मोठ्या कष्टाने उडीद पापड, लिंबू क्रश लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा पावडर, भाजणी चकली स्वतः तयार करून विक्री केली.शासन योजनांना पदरात पाडले आणि रोजगाराची नवी वाट शोधली. त्यानंतर यशाचा शिखर गायत्री परिवाराने गाठले. आता कांदा, लसूण, कडीपत्ता आदी पदार्थांचे निर्जलीकरण करून त्यापासून पावडर तयार केली जाते. या प्रकल्पातील तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मागणी आहे. या माध्यमातून हा प्रकल्प बचतगटातील महिलांसाठी रोजगार निर्मितीचे महत्वाचे साधन बनले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेंतर्गत 6 लाख रुपये खर्चातून हा सूक्ष्म प्रकल्प साकारण्यात आला आहे. त्यास शासनाचे 35 टक्के अनुदान मिळाले आहे. वंदना पाटील यांनी उद्योग क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा हिरकणी नवउद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 8 मार्च 2021 मध्ये महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्रातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला घरगुती उद्योगांसह प्रक्रिया उद्योगांना चालना
शेवग्याचा पाला, कडीपत्ता अशा विविध आयुर्वेेदाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या वस्तूंना मागणी आहे. त्याअनुषंगाने या पावडर बनविण्यासाठी विशेष लक्षकेंद्रीत केले जाते. संबंधित वस्तूच्या प्राप्त ऑर्डरनुसार बचतगटातील महिलांना काम मिळते. पावडरची मागणी वाढल्यास बचतगटाचे कामही वाढते. या लघू प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळत असल्याने ग्रामिण भागासाठी असे शासनाचे प्रकल्प वरदानच ठरणार असल्याचे बचतगटाच्या उपाध्यक्षा वंदना पाटील यांनी सांगितले.
महिला बचतगटांना 4 लाख बीज भांडवल
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सन 2020-21 ते 24-25 या पाच वर्षांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या माध्यमातून अन्न प्रक्रियेवर आधारीत नव्याने उभारण्यात येणार्या सूक्ष्म उद्योगांना आणि जुन्या उद्योगांना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे. त्यातूनच या सर्व प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. यातून या उद्योगांना 35 टक्के अनुदान आणि महिला बचत गटांना 4 लाख बीज भांडवल देण्यात येते.त्यासाठी कृषी विभाग आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. यासंदर्भातचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून समाधान पाटील यांनी मदत केली.उद्योगाची नवी वाट
नाशवंत फळे व भाजीपाला आणि ज्यावेळी फळे व भाजीपाला यांना बाजारात भाव नसतो. त्यावेळी शेतकरी आपल्या मालास वाळवून म्हणजेच त्यांच्यावर मूल्यवर्धन करून त्यास भाव असेल तेव्हा विक्री करू शकतो. त्यासाठी शासनाने असे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी त्यांना अनुदानरुपी बळ दिले आहे. जेणेकरून शेतकरी कुटुंबिय असे सूक्ष्म प्रकल्प उभे करून उद्योगाची नवी प्रकाश वाट निर्माण करतील.
अशी सुचली प्रकल्पाची कल्पना :
वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती असून त्या फळबागायत करीत होत्या. त्यांचा मुलगा एम्एस् करण्यासाठी अमेरिकेत गेला. तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत रेडी टू कूक भाज्या तसेच उपमा, पोहे दिले. त्यात निर्जलीकरण केलेले वाटाणे, गाजर इ.पदार्थ होते आणि त्यामुळे यांना निर्जलीकरणाची कल्पना सूचली. कृषी विभाग जळगाव आणि कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. आत्मविश्वासाच्या बळावर 19 नोव्हेंबर 2022रोजी जागतिक महिला उद्योजगता दिनाच्या दिवशी गायत्री फूड्स नावाने प्रकल्प सुरू केला. सुरवातीला टोमॅटो, अद्रक, कांदा, शेवगा, बीट, कढीपत्ता, पुदिना, लसूण इ.निर्जलीकरण करून पावडर आणि फ्लेक्स तयार करायला सुरुवात केली आणि प्रतिसादही चांगला मिळाला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 3 लाख 90 हजार रुपये बीज भांडवल उपलब्ध करून दिले आणि गटाने भरारी घ्यायला सुरुवात केली. तसेच वंदना पाटील यांना केळफूल पावडरची ऑर्डर मिळाली. केळफूल पावडर आणि शेवगा पानांची पावडर हे वेस्टपासून बेस्ट उत्पादने आहेत. मधुमेह रूग्णांसह कुपोषित बालकांसाठी टाकाऊ केळफुलांपासून पावडर तयार केली. या सर्व पदार्थांचा बाजारात चांगली मागणी वाढली.