सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित

जळगाव : जिल्ह्यात ग्युलन बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मीळ आणि गंभीर आजाराने शिरकाव केला असून, आता जळगाव शहरातील एका तीन वर्षीय बालकाला या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बालकावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) बालरोग विभागातील अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला साध्या वेदनांसारखा वाटणारा हा त्रास वाढत गेला, त्यामुळे त्याच्या पालकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. रक्त तपासणी आणि अन्य वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्याला ग्युलन बॅरे सिंड्रोम असल्याचे स्पष्ट झाले.

या आजाराच्या जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण समोर आले आहेत. यापैकी एका महिला रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून, तर रावेर तालुक्यातील एका तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

दरम्यान, या बालकावर GMCचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे आणि डॉ. गिरीश राणे उपचार करत आहेत. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून, पुढील काही दिवस त्याच्यावर बारकाईने देखरेख ठेवण्यात येणार आहे.

जीबीएस आजार काय आहे?

ग्युलन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल आजार असून, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्नायूंवर हल्ला करते. त्यामुळे स्नायूंना कमजोरी येते, हालचालींवर परिणाम होतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण पूर्णपणे अर्धांगवायूग्रस्त होऊ शकतो. हा आजार मुख्यतः संसर्गानंतर होतो, ज्यामध्ये विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा गोंधळ उडतो.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते, जीबीएस हा संसर्गजन्य नसला तरी लवकर निदान आणि त्वरित उपचार आवश्यक असतात. त्यामुळे मुलांना सतत पायदुखी, कमजोरी, बधीरपणा जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

आरोग्य प्रशासन सतर्क

जिल्ह्यात वाढत्या जीबीएस प्रकरणांमुळे आरोग्य विभागही सतर्क झाला असून, संशयास्पद रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या रुग्णांवर योग्य उपचार मिळावेत यासाठी GMCसह इतर रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.