---Advertisement---

चिंता वाढली! जळगाव जिल्ह्यात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, २२ वर्षीय तरुण बाधित

---Advertisement---

जळगाव । जिल्ह्यात पुन्हा एकदा गिलियन बरै सिंड्रोम (GBS) चा रुग्ण आढळून आला असून, २२ वर्षीय तरुण या आजाराने बाधित झाला आहे. सद्यस्थितीत जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हा तरुण काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला अशक्तपणा, अंगदुखी, पायाला मुंग्या येणे, चालण्यात अडथळा येणे अशी लक्षणे जाणवू लागली. सुरुवातीला त्याने बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, लक्षणे अधिक गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला न्यूरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’

रुग्णाची परिस्थिती पाहता, आरोग्य प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, प्रशासनाच्या सूचनेनुसार मंगळवारी या रुग्णाला जळगाव GMC रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्याच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी सांगितले की, सध्या तो अतिदक्षता विभागात आहे आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

जळगावमध्ये यापूर्वीही आढळले होते रुग्ण

गेल्या काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यात GBS चे रुग्ण आढळले आहेत. डिसेंबर महिन्यात जळगाव शहरात एका पुरुषाला हा आजार झाल्याचे आढळले होते. तर, जानेवारी महिन्यात ४० वर्षीय महिलेचा GBS अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

GBS म्हणजे काय? लक्षणे आणि उपाययोजना

गिलियन बरै सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसा (नर्व्हस) वर हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होणे, शरीराला मुंग्या येणे, अंगदुखी, चालण्यात अडथळा येणे अशी लक्षणे दिसतात. योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

नागरिकांनी घाबरू नये, सावधगिरी बाळगावी

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरू नका, परंतु कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच, योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वैद्यकीय तपासणी केल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment