जळगाव : केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून जळगावकरांना 24 तास पाणी मिळेल, दुसऱ्या मजल्यावर विना वीज मोटार पाणी येईल, अशी स्वप्ने महापालिकेतर्फे जळगावकरांना दाखविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष्ाात स्थिती काही वेगळीच आहे. जळगावकरांना 24 तास पाणी हवे असेल तर त्यासाठी पाण्याचे मीटर लावावे लागणार आहे. मीटर न लावणाऱ्यांना आजच्या प्रमाणे एक ते दीड तास पाणी मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेत जळगाव महापालिकेचा समावेश करण्यात आला.या योजनेनुसार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणापासून तर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मुख्य जलकुंभापर्यंत, मुख्य जलकुंभांपासून तर प्रत्येक नळंसंयोजनापर्यंतची पाईप लाईन बदलवण्यात येत आहे. यामुळे जुनी जलवाहीनी व नळसंयोजन बंद होत ते नव्या जलवाहिनीवर स्थलांतरीत करण्यात आले आहेत.
सहा वर्षात 60 टक्के काम
अमृत योजनेचे काम निधार्रीत कालावधीत म्हणजे निविदेनुसार दोन वर्षात पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु विविध कारणांमुळे या कामास विलंब होत गेला आणि 6 वर्षात 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 40 टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. आता अमृत 02 च्या कामाची निविदा काढण्यात आली असून एजन्सींही नियुक्त करण्यात आली आहे. मात्र अमृत 02 च्या कामास अजून सुरूवात झालेली नाही.
लावावे लागणार पाण्याचे मीटर
अमृत योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम 60 पूर्ण झालेले आहे. उर्वरीत 40 टक्के काम पूर्ण होईल. 24 तास पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे मिटर लावावे लागणार आहे. जेव्हा पाण्याचे मिटर लागेल तेव्हा पाणी पट्टीतच्या करात बदल होतील. ज्यांनी मिटर लावले नाही त्यांना मात्र आजच्या प्रमाणे एक ते दीड तास पाणी पुरवठा होणार आहे.
जुनी मुख्य जलवाहीनीचाही होणार वापर
वाघूर धरणापासून तर शहरातील मुख्य जलकुंभांपर्यत असलेली जुनी मुख्य जलवाहीनी बंद करण्यात येणार नाही. तीचा पर्यायी व्यवस्था म्हणून वापर करण्यात येणार आहे. अमृत योजनेत टाकण्यात आलेली मुख्य जलवाहीनीनला कोठे गळती लागली किंवा अन्य काही कारणांमुळे त्यातून पाणी पुरवठा करता येणे शक्य नसेल तेव्हा जुन्या जलवाहनीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाणी पुरवठा खंडीत होणार नाही. परिणामी पाणी पुरवठ्याचे रोटेशन वारंवांर बदलावे लागणार नसल्याचेही पाणी पुरवठा अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.
झोननिहाय 60 टक्के कामे पूर्ण
अमृत योजनेच्या कामाचे महापालिकेने झोन तयार केले आहे. यानुसार सुप्रीम कॉलनी, निमखेडी, गिरणा या पहिल्या झोनमध्ये अमृतचे 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे. यातील काही भागात अमृत योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर डीएसपीझोन मधील रायसोनी नगर व परिसरातील अर्धा भागाचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बहिणाबाई झोनमधील खेडी व परिसरात, एमआयडीसीचे 45 टक्के, मेहरून 40 टक्के, हेमू कलाणी 40 टक्के, रिंगरोड, ख्वॉजामिया दर्गा परिसर, शिवा नगर, खंडेराव नगर या परिसरात जवळपास 60 टक्के काम पूर्ण झालेले असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी संगितले. अजुनही शहराच्या बऱ्याच भागात अमृत योजनेचे काम अपूर्ण आहे.