खलिस्तानचे भूत!

 

– रवींद्र दाणी

पंजाबमधील  स्थितीबाबत याच स्तंभातून जे इशारे दिले जात होते ते दुर्दैवानेे खरे ठरत आहेत. खलिस्तानचे भूत पुन्हा जागे होत आहे. खलिस्तानी समर्थक ‘वारिस दे पंजाब’चा संस्थापक अमृतपाल सिंग  बेपत्ता आहे आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे त्याच्या समर्थनार्थ लंडन, सॅन फ‘ॅन्सिस्को, कॅनबेरा यासारखा शहरांमध्ये जी निदर्शने झालीत ती भयकंपित करणारी आहेत. राज्याच्या राजकारणात नेहमीच दबदबा असणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने अप्रत्यक्षपणे अमृतपालला पाठिंबा दिला आहे. पंजाबचा घटनाक्रम कोणत्या दिशेने जात आहे?

 

 

हरयाणातही पाठिंबा

पंजाबच्या शेजारी राज्यात – हरयाणातही –  अमृतपालला मोठा पाठिंबा मिळत आहे. कर्नालमध्ये ते दिसून आले. शहरातील शीख समाजाने अमृतपालच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. अमृतपाल हा शीख युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी काम करीत आहे, त्याला बदनाम करू नका, असे शीख समाजाला वाटत असल्याचे म्हटले जाते. अमृतपाल सिंग प्रकरण अचानक समोर आले असले तरी देशाबाहेरही त्याला जो पाठिंबा मिळत आहे तो काहीसा थक्क करणारा आहे. अमृतपाल सिंगला पकडण्याचे प्रयत्न पंजाब पोलिस करीत असले तरी अद्याप यात त्यांना यश आलेले नाही.

 

भिंद्रानवालेची पुनरावृत्ती?

पंजाबच्या राजकारणात कधी काळी काँग्रेस व अकाली दल हेच दोन पक्ष होते. अकाली दलाला शह देण्यासाठी काँग्रेसने भिंद्रानवाले नावाचे भूत उभे केले होते. भिंद्रानवाले आपल्या सशस्त्र समर्थकांसह राजधानी दिल्लीत वारंवार येत होता. पण, त्याला अटक करण्याचे साहस केंद्र सरकारमध्ये नव्हते. नंतर या भुताने पंजाबमध्ये हैदोस घालणे सुरू केल्यावर त्याचा सफाया करण्यासाठी इंदिरा गांधी सरकारला सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई करावी लागली. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने करण्यात आलेल्या कारवाईत भिंद्रानवालेला ठार करण्यात आले. त्याची प्रतिक्रिया म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. याची प्रतिक्रिया दिल्लीत उमटत मोठ्या प्रमाणावर शीखविरोधी दंगली झाल्या. आणि या दंगलींची प्रतिक्रिया म्हणून पंजाबातील दहशतवाद अधिक भडकला. नंतर सत्तेवर आलेल्या राजीव गांधींनी राजकीय परिपक्वता दाखवीत अकाली नेते संत लोंगोवाल यांच्याशी करार केला आणि राज्याची सत्ता अकाली दलाकडे सोपविली. प्रथम सुरजितसिंग बर्नाला व नंतर काँग्रेस मुख्यमंत्री बेअंतसिंग आणि पोलिस प्रमुख ज्युलियो रिबेरो व कंवरपालसिंग गिल या चौघांनी  पंजाबमधील खालिस्तानी चळवळ मोडून काढली होती. आता या चळवळीने पुन्हा डोके वर काढले आहे.

 

 

रिबेरोंची नियुक्ती

दहशतग‘स्त पंजाबच्या घटनाक्रमाला निर्णायक वळण देणारी घटना होती ज्युलियो रिबेरो यांची राज्य पोलिस प्रमुख म्हणून झालेली नियुक्ती. रिबेरो त्यावेळी गृह मंत्रालयात विशेष सचिव पदावर कार्यरत होते. राज्यातील परिस्थिती ढासळत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी सुटीच्या दिवशी रिबेरो यांना पंजाबात पाठविण्याचा निर्णय घेतला होता. गुड फ्रायडेची सुटी असल्याने रिबेरो आपल्या सरकारी निवासस्थानी झोपले होते. त्यांना तातडीने पंतप्रधान निवासात पोहोचण्याचा आदेश देण्यात आला आणि  पंजाबकडे जाण्यास सांगण्यात आले. मी माझ्या घरी जाऊन पत्नीला सांगतो आणि कपडे वगेरे घेऊन चंदीगडला जातो असे सांगितल्यावर, राजीव गांधींनी त्यांना सांगितले होते, तुम्ही येथून सरळ विमानतळावर जा! तुमच्यासाठी विमान तयार आहे. पत्नी व तुमचे कपडे मागून दुसर्‍या विमानाने चंदीगडला पोहोचतील.

 

 

रिबेरो चंदीगडला पोहोचले आणि त्याच रात्री  दहशतवाद्यांनी पुन्हा एक मोठा हल्ला केला. रात्री झोपेतून उठवून रिबेरो यांना याबाबत माहिती देण्यात आली. आणि स्वत: जवळ गणवेश नसताना ते नागरी वेषात हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते. रिबेरो यांनी मोठ्या निकराने राज्यातील दहशतवादाला नियंत्रणात आणले होते आणि गिल यांनी त्यास मूठमाती दिली होती.

 

 

बुलेट फॉर बुलेट

रिबेरो पोलिस प्रमुख असताना ‘बुलेट फॉर बुलेट’ ही घोषणा फार गाजली होती. हे शब्द रिबेरो यांच्या तोंडी घालण्यात आले होते, तरी ते त्यांचे नव्हते. ते होते तत्कालीन अंतर्गत सुरक्षा राज्यमंत्री स्व. अरुण नेहरू यांचे. रिबेरोंच्या नावाने नेहरू यांनी हे शब्द प्रचलित केले होते. अर्थात रिबेरो यांना याचा फायदाच झाला.

 

 

सरकार गाफील

पंजाब सरकार  अमृतपालच्या बाबतीत एवढे गाफील कसे राहिले असा प्रश्न आता विचारला जात आहे. अमृतपालला आयएसआयची फूस आहे असे केंद्र सरकारला वाटत आहे. या घटनाक‘मात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमृतपालच्या समर्थनार्थ जगाच्या काही मोठ्या शहरांमध्ये उमटलेले पडसाद! याचा अर्थ म्हणजे अमृतपालची प्रतिमा केवळ पंजाब-हरयाणात नाही तर जगातही तयार होत होती. मात्र, याचा कुणालाही पत्ता लागला नाही. याचा जाब गुप्तचर विभागालाही विचारण्यात आला पाहिजे.

 

 

जोकर मुख्यमंत्री

पंजाबमधील  स्थिती गंभीर होत असताना, राज्याचा मुख्यमंत्री एक जोकर आहे ही आणखी एक गंभीर बाब. मुख्यमंत्री मान यांना आपल्या पत्नीची सुरक्षा महत्त्वाची वाटत आहे तर आपचे नेते केजरीवाल यांना राष्ट्रीय नेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले आहे. केजरीवाल यांनी देशभरातील आठ मुख्यमंत्र्यांची एक परिषद दिल्लीत बोलविण्याचा प्रयत्न केला. भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, एकाही मुख्यमंत्र्याने- पक्षाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. केजरीवाल यांना देश चालवायचा आहे. पण, ती क्षमता- अनुभव त्यांच्याजवळ नाही. आता तर पंजाबमधील घटनाक्रमाने त्यांना बचावात्मक स्थितीत आणले आहे.

 

साम्य!

अमृतपाल  आणि भिंद्रानवाले यांच्यात काही साम्य दिसून येत आहे. भिंद्रानवालेेही शीख युवकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला होता. अमृतपाल प्रकरणात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. भिंद्रानवालेने स्वत:ची सेना तयार केली होती. भारतीय लष्करातील एक सेवानिवृत्त अधिकारी मेजर जनरल शुभेगसिंगने भिंद्रानवालेच्या समर्थकांना लष्करी कारवाईचे प्रशिक्षण दिले होते. अमृतपालने देखील स्वत:ची सेना तयार केली असल्याचे मानले जाते. केंद्र सरकारसाठी ही एक चिंतेची बाब ठरत आहे. अमृतपाल प्रकरणी हिंसाचार झाल्यास त्याचे विदेशात जास्त परिणाम होतील असे मानले जात आहे. हे प्रकरण राज्य व केंद्र दोन्ही सरकारांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे.

 

 

अमृतपाल  पकडला न गेल्यास पंजाब सरकारचे नाक कापले जाते आणि पकडला गेल्यास त्याचे काय करावयाचे हा मोठा प्रश्न पंजाब सरकारसमोर राहणार आहे. भिंद्रानवालेला जसे ठार करण्यात आले तसे काही अमृतपालच्या बाबतीत करता येणार नाही. मग, अमृतपालला पकडून त्याचे करावयाचे काय असा प्रश्न समोर असताना त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पंजाबची सत्ता पहिल्यांदाच मिळालेल्या आम आदमी पक्षासाठी याचे राजकीय परिणाम काय असतील हा या घटनाक‘मातील सर्वात मोठा प्रश्न ठरत आहे.