जळगाव : शरद पवार यांच्या कार्यकाळात पन्नास वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला (maratha reservation) त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले. मात्र आता विरोधकांना एवढा कळवळा का, आला असा टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. या वेळी आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.
जालना (jalna lathi charge )येथे मराठा समाजाच्या (maratha reservation) आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, की जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर आम्ही सर्व त्यांच्या संपर्कात होतो.
पण काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकला नाही व शुक्रवारी (ता. १) दुपारी अचानक लाठीमाराची दुर्दैवी घटना घडली. वास्तविक ही घटना घडायला नको होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. परंतु शासनातर्फे उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते.
उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जिवाचे बरे-वाईट होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविणे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते.
विरोधकांना एवढा कळवळा का?
लाठीमाराची घटना दुर्दैवीच आहे; परंतु मराठा समाजासाठी काहीही न करणाऱ्या विरोधकांना एवढा कळवळा आताच कसा आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, शरद पवार गेली पन्नास वर्षे सत्तेत होते. त्यांनी आरक्षण दिले नाही.
उलट ते म्हणाले होते, मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे? त्यांच्या या वक्तव्याची माझ्याकडे क्लीप आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत होते. त्या वेळी त्यांनीही आरक्षणसाठी प्रयत्न केले नाही.
त्या वेळी ते कधीही घराच्या बाहेर निघाले नाहीत. आता आंदोलकांना भेटायला निघाले आहेत. त्याचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे.
उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते; मात्र सत्ता असताना विरोधकांना ते न्यायालयात टिकविता आले नाही. त्यांनी त्यासाठी चांगला वकील देण्याचा प्रयत्नच केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.