कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधून प्रेयसीच्या हत्येचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील एका ओयो हॉटेलच्या खोलीत एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. मुलीच्या शरीरावर १७ वेळा चाकूने वार करून हा गुन्हा करण्यात आला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
मृत महिलेचे नाव हरिनी असून हत्या केलेल्या आरोपीची ओळख सॉफ्टवेअर इंजिनिअर यशस अशी झाली आहे. दोघेही बेंगळुरूच्या पश्चिम उपनगरातील केंगेरी येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय यशसने पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या खोलीत त्याच्या प्रेयसी हरिनीची हत्या केल्याचा आरोप आहे.
यशसने हरिनीला ओयो हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे दोघांमध्ये नाते संपवण्यावरून भांडण झाले. त्यानंतर यशसने हरिनीवर १७ वेळा चाकूने वार करून तिची हत्या केली. ही घटना ६ जूनच्या रात्री घडली त्यानंतर ही घटना दोन दिवसांनी ८ जून रोजी ती उघडकीस आली. याप्रकरणी सुब्रमण्यपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीसीपी लोकेश जगलासर म्हणाले की, बेंगळुरूमधील सुब्रमण्यपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६-७ जून रोजी एका ३३ वर्षीय महिलेची तिच्या जवळच्या मित्राने हत्या केली. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना सुमारे एक वर्षापासून ओळखत होते. मृत महिला गेल्या दोन महिन्यांपासून हळूहळू आरोपींपासून दूर जात होती आणि त्यामुळे आरोपीने रागावून तिला चाकूने वार केले.