जळगाव : नांदेड जिल्ह्यातील तालुका किनवटमधील मारेगाव येथील तिन दलित मुलीच्यावर अनन्वीत अत्याचारानंतर निर्घृण खून करून 27 मे रोजी वैनगंगा नदीच्या नाल्यात फेकण्यात आले. या हत्याकांडातील नराधमांना अटक करून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, तिनही मुलींवर नराधम शेख जावेद शेख इब्राहिम रा.जायफळ ता. माहूर जिल्हा नांदेड व त्याचे दोन साथीदार यापैकी एक जण हैद्राबाद येथील दलाल यांनी अत्याचार केलेत. यातील मुख्य आरोपी शेख जावेद शेख इब्राहिम याने त्याच्या मित्रांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मृत तिघा मुलींवर दबाव आणला. त्यांनी जेव्हा अशा कृतीला नकार दिला, तेव्हाच हे माणुसकीला काळिमा फासणारे हत्यांकाड घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, अतिशय क्रुरतेने मृत मुलींच्यावरही बलात्कार करून या नराधमांनी गुन्हा उघडकीस येईल या भितीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी शंका गावक-याच्या मनात निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मुली सुरंक्षित नाहीत हे दुर्दैव आहे. तेलंगणच्या सिमेवर असणाऱ्या या जिल्हातून अवैध गो-तस्करी, अनेक अवैध धंद्याच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून, फुस लावून लव- जिहादच्या जाळ्यात अडकवून मुलींची तस्करी करणाऱ्या या षडयंत्रावर ताबडतोब कठोर कारवाई करण्यात यावी. याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून अट्राॅसिटी व पोस्को कायद्यातंर्गत तसेच खुनाचे -302 कलम लावून कठोर शासन म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेवून आपण स्वतः पिडीत दलित कुटूंबाची भेट घ्यावी. महीला आयोगाच्या मार्फत या गंभीर घटनेची चौकशी करून कठोर कलम लावून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना द्यावेत अशी विश्व हिंदु परिषद जळगावने मागणी केली आहे. या हत्याकांडातील या नराधमांना अटक करून लवकरात लवकर कठोर कारवाई केली नाही तर, विश्व हिंदु परिषद कायदेशीर मार्गाने आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करताना जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, विभाग संयोजक राकेश कोल्हे, जिल्हा सह सेवा प्रमुख दीपक दाभाडे , पवन झुंजारराव, आकाश पाटील, भावेश वारुळे, आशिष ठाकरे आदी उपस्थित होते.