jalgaon news: प्रेमनगरात या देवीची चोरली मूर्ती

जळगाव : पंचधातूने बनवलेली सुमारे 15 हजार किमतीची सप्तश्रृंगी देवीची आकर्षक मूर्ती तसेच सुमारे 900 रुपये किमतीचे देवीच्या चरण-पादुका चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील प्रेमनगरातील मंदिरात शुक्रवार, 15 रोजी घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी बुधवार, 20 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपासचक्रे फिरवून जिल्हापेठ पोलिसांनी गुरूवार 21 रोजी तुषार रामचंद्र भारंबे (38) रा.संत ज्ञानेश्वर कॉलनी शिवकॉलनी याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

प्रेमनगरात श्रीसप्तश्रृंगी मंदिर असून या देवालयात पंचधातूची एक फूट उंचीची देवीची मूर्ती तसेच एक किलो वजनाच्या पितळी चरण-पादुका विराजमान होते.या मंदिरात भूषण किशोर जोशी हे पुजारी आहेत. चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मूर्तीसह चरण पादुका चोरून नेल्या.हा प्रकार 15 रोजी सकाळी 9.10 ते 9.25 वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी भूषण जोशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  मूर्ती चोरीतील संशयित  हा सराफ बाजारात असल्याची गोपनीय माहितीवरून पोनि विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील हेकॉ सलीम तडवी,पोकॉ रविंद्र साबळे,पोकॉ तुषार पाटील,पोकॉ जयेश मोरे,पोना कमलेश पवार,पोकॉ कैलास शिंदे तपासी अंमलदार हेकॉ भारती देशमुख यांचे पथक सराफ बाजारात धडकले. तपासचक्रे फिरवून पथकाने संशयिताला देवीची मुर्ती तसेच चरण पादुका असा चोरीस गेलेला मुद्देमालासह ताब्यात घेतले.