भुसावळ ः तालुक्यातील गोजोरा येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बाजारभावानुसार 12 लाख रुपये किमतीचे सुमारे 195 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले होते. या घरफोडीबाबत कुठलाही पुरावा नसताना भुसावळ तालुका पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत चौकडीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय आरोपींच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी येथे दिली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गुन्ह्याची उकल केल्याबाबत माहिती दिली.
असे आहे घरफोडी प्रकरण
गोजोरा, ता.भुसावळ येथे मालतीबाई अभिमान चौधरी (57) या सेवानिवृत्त पती व विधवा मुलगीसह वास्तव्यास आहेत. चौधरी कुटुंंब पुणेस्थित मुलाला मुलगी झाल्यानंतर पाहण्यासाठी गेल्यानंतर 26 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 7 रोजी नातेवाईकांनी घर उघडे असल्याचे माहिती चौधरी कुटुुंबियांना दिल्यानंतर त्यांनी खातरजमा केली असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले होते. चोरट्यांनी सहा लाख 13 हजार 600 रुपये किमतीचे 195 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने लांबवल्याने याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल होता.
सीसीटीव्हीत गवसले संशयित
पोलीस पथकाने घटनास्थळावरून आरोपींचे फिंगर प्रिंट घेतले. तसेच सीसीटीव्हीद्वारे शोध घेतल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12.40 तीन संशयित दुचाकीवरून येताना दिसल्यानंतर संशयित नशिराबादमार्गाने आल्याचे व त्याच मार्गाने गेल्याचे स्पष्ट झाले. संशयितांची ओळख पटवण्याकामी यंत्रणा अहोरात्र परीश्रम घेत असतानाच 12 रोजी पहाटे दोन वाजता गोजोरा गावातच तीन अज्ञात संशयित पुन्हा दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती यंत्रणेला मिळताच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बोलते केले असता त्यांनी यापूर्वी गोजोरा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
कुविख्यात आरोपींना अखेर बेड्या
पपोलिसांनी रवी प्रकाश चव्हाण (18, शबरीनगर, तांबापुरा, जळगाव), जुनैद उर्फ मुस्तकीनशहा भिकन शहा (22, तांबापुरा, मच्छीमार्केट, जळगाव) व विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी गोजोरा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. रवी चव्हाण विरोधात पोलिसात तीन तर रामानंद पोलिसात दोन गुन्हे तसेच जुनेदविरोधात जिल्हापेठ पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. आरोपी रवी चव्हाणचा साथीदार गुरुदयाल मनजीतसिंग टाक (जळगाव) याने बारडोली, गुजरात येथे सराफा व्यावसायिक कन्हैयालाल मणिलाल सोनी (43, पटेलनगर, गुजरात बारडोली) यास विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर सराफाकडून 154 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले तर आरोपींनी सराफाकडून मिळालेल्या सहा लाख 40 हजारांपैकी आरोपी रवीने दोन लाख 40 हजार स्वतःजवळ, जुनेदला एक लाख, अल्पवयीनास दोन लाख तसेच गुरुदयाल टाक यास एक लाख दिल्याची कबुली दिल्याने त्यासही अटक झाली. अटकेतील चौघांना 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपास पथकाचे कौतुक
पपत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह तपास पथकाचे कौतुक केले. तसेच तपास पथकाची आयजी रिवॉर्डसाठी शिफारस केल्याचे सांगितले.
11 लाखांचा मुद्देमाल जप्त
पअटकेतील आरोपींकडून एक लाख 92 हजार 500 रुपयांची रोकड, सात लाख 32 हजार 530 रुपये किमतीचे 154 ग्रॅम वजनाचे सोने, चार हजार रुपये किमतीचे चांदी, दिड लाख रुपये किमतीच्या दुचाकी असा एकूण 10 लाख 94 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
यांनी उघडकीस आणली घरफोडी
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार संजय तायडे, हवालदार युनूस शेख, हवालदार दीपक जाधव, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार धीरज मंडलिक, चालक हवालदार सादीक शेख, हवालदार राजू काझी, हवालदार उमाकांत पाटील, बाजारपेठचे कॉन्स्टेबल जगदीश भोई, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण आदींच्या पथकाने केली.