सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, जाणून घ्या जळगावच्या सुवर्णपेठेतील ताजे भाव

जळगाव ।  बजेटनंतर सोन्याच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, बजेटनंतरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, यामुळे सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

जळगावच्या सुवर्णपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोने दरात वाढ झाली असून, दुसरीकडे चांदी दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. सध्या सोन्याचे दर जीएसटीसह ८५००० रुपयांच्या वर पोहोचले आहेत.

सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता ८३,२०० रुपयांवर पोहोचला, तर जीएसटीसह हा दर ८५,६९६ रुपये झाला. दुसरीकडे, चांदीचा दर मात्र १००० रुपयांनी घसरला असून, तो ९४,००० रुपये प्रति किलोवर आला आहे.

हेही वाचा : अनैतिक संबंधातून हत्याकांड, 35 वर्षीय सीमाला 29 वर्षीय प्रियकर राहुलने संपवलं

गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १९०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

बजेट जाहीर झाल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ झाली होती आणि तो दर ८२,९०० रुपयांवर पोहोचला होता.

विशेष म्हणजे, यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये सोन्याबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की स्थिर राहणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण

तापमानाचा लहरीपणा; उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा मोठा चढ-उतार जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

सोमवार (५ फेब्रुवारी) रोजी जळगावचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या. विशेषतः दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान तापमानात लक्षणीय चढ-उतार होणार आहेत. या कालावधीत किमान तापमान १५ ते १७ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३२-३३ अंशांपर्यंत पोहोचू शकते.

८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात पुन्हा तापमानवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सकाळच्या वेळेस थंडीचा काहीसा प्रभाव जाणवेल. उत्तर आणि मध्य भारतातील हवामानातील बदलांचा परिणाम जळगाव जिल्ह्यावर होत असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

उष्णतेमुळे नागरिकांची त्रस्त अवस्था झाली असली, तरी पहाटेच्या वेळेस थोडीशी गारवा देणारी थंडी काही प्रमाणात दिलासा देईल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.