तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । मुंबई विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 4712 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे अडीच कोटी रुपये आहे. ही कारवाई आज सोमवारी करण्यात आली असून यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींकडे कस्टम विभागाचे पथक कसून चौकशी करत आहे.
सूत्रानुसार, मुंबई विमानतळावर सोन्यासह आरोपी आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला मिळाली. त्यानुसार त्यांनी सीमाशुल्क विभागाच्या पथकांना मुंबई विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात सांगितले होते. दरम्यान, पहिल्या प्रकरणात, कस्टम्सने खास डिझाइन केलेल्या अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले 1872 ग्रॅम सोने जप्त केले. आणखी एका प्रकरणात, फ्लाइटच्या शौचालयात लपवून ठेवलेले 2840 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
या दोन्ही प्रकरणात सीमा शुल्क विभागाने 4712 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याच्या तस्करी प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.