जळगाव : जळगाव जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशातच आता महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधीच भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पुरातन महादेव मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
कजगावच्या वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी भागात पुरातन मनकामेश्र्वर महादेव मंदिर आहे. २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून महादेवाच्या पिंडीवरील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग लंपास केले. या चोरीत मंदिरातील तांबे-पितळाच्या एकूण ७० ते ८० हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. मात्र, सकाळी भाविक दर्शनासाठी आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. चोरीची बातमी गावभर पसरताच नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असून भडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जळगाव जिल्ह्यात मंदिर, घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आता देवस्थानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. धार्मिक स्थळी होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून चोरट्याला अटक करावी आणि देवस्थानांचे संरक्षण वाढवावे, अशी मागणी स्थानिक भाविक आणि नागरिकांकडून होत आहे.
भडगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. महाशिवरात्रीपूर्वीच झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, लवकरात लवकर आरोपीला अटक होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.