मान्सूनबाबत आनंदाची बातमी; असा आहे हवामान तज्ञांचा अंदाज

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जून महिन्यात मान्सूनचं आगमन लांबलं होतं. पावसानं ओढ दिल्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं असून विविध भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरु आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यामुळे यंदा पावसाची स्थिती कशी राहील ? याची चिंता शेतकऱ्यांसह अनेकांना सतावत आहे. मात्र यंदा मान्सूनबाबत मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

यंदा भारतात मान्सूनचं वेळेत आगमन होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मान्सून वेळेत भारतात दाखल होईल आणि सरासरीच्या सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सध्या सक्रीय असलेला अलनिनो जून महिन्यात कमजोर होईल त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ला नीना साठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२४ चा मान्सून चांगला राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वसाधारणपणे ज्यावेळी अलनिनो सक्रीय असतो त्यावेळी भारतात दुष्काळ पडतो आणि मान्सून पाऊस देखील कमी पडतो. दुसरीकडे ज्यावेळी ला नीना सक्रीय असतो त्यावेळी अधिक पाऊस पडतो आणि थंडीचं प्रमाण देखील वाढतं. यंदा दुष्काळाला कारणीभूत असलेला अलनिनो कमजोर होणार असल्याने यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.