Jalgaon News : खान्देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, केळी भावात वाढ!

जळगाव : खान्देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी महाशिवरात्री व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीच्या मागणीत वाढ झाली असून, यामुळे बाजारातील केळीच्या दरात समाधानकारक वाढ झाली आहे. सध्या केळीच्या किमान दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ होऊन तो १,८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संक्रांतीनंतर थंडी कमी होत उष्णता वाढू लागल्याने बागेत परिपक्वतेसाठी रखडलेला केळीमाल मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागला होता. मात्र, मुंजोबाच्या यात्रेपासून थंडीचा जोर पुन्हा वाढल्याने केळीमालाची आवक काही प्रमाणात मंदावली.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

या काळात आंध्र प्रदेशातील केळीमाल मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होता. त्याचा गुणवत्ताही चांगला असल्याने त्या केळीमालाला मागणी होती. तथापि, महाशिवरात्री व रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर खान्देशी केळीमालाची मागणी झपाट्याने वाढली आहे.

सध्या केळीचे कमाल दर २,२०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत, तर किमान दर १,३०० ते १,४०० रुपयांवरून १,८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहेत. ही वाढ केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील केळीमाल काही दिवसांत संपुष्टात येणार असून त्यानंतर जळगाव, शहादा, शिरपूर तसेच गुजरातमधील केळीमालाची आवक सुरू होईल. उष्णतेत वाढ होत असल्याने केळीची मागणीही सातत्याने वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या काळातही केळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

येत्या २५ दिवसांनंतर खान्देशातील केळीचा परदेशात निर्यातीस प्रारंभ होणार आहे. मागील पंधरवड्यात खान्देशात दररोज सुमारे २४ ट्रक केळीची आवक होत होती, परंतु मागील काही दिवसांत त्यात ५ ते ६ ट्रकने वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातही व्यापाऱ्यांची मोठी उलाढाल सुरू आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. आगामी काळातही मागणी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी माल विक्रीस आणावा, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.