जळगाव : देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. त्यातच आता जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याबाबतचे संकेत बैठकीत देण्यात आले. परिणामी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. जळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
अर्थसंकल्पानंतरच्या काळाचा विचार केला तर सोन्याच्या दरात सातत्याने दर वाढ झाली असल्याचं पाहायला मिळाले होते. जीएसटीसह 60 हजार रुपये इतकी मोठी उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अवाक्याबाहेर गेले होते. परिणामी अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करणे थांबवले होते तर अनेकांनी तर वाढत्या दराचा फायदा घेत आपल्याकडील सोने मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले होते.
मात्र गेल्या पंधरवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने कमी अधिक प्रमाणत घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळत असून गेल्या चोवीस तासात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जीएसटीशिवाय दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 56 हजार 300 रुपयांवरुन 55 हजार 300 रुपयांवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला असल्याने सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे.