DA Hike : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते, तो महत्वाचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. हा महागाई भत्ता दोन टाक्यांनी वाढवण्यात आलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता (DA) (DR) ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगा अंतर्गत ही वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापूर्वी जुलै २०२४ मध्ये वाढ झाली होती. तेव्हा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. तेव्हा तीन टक्के वाढ झाली होती. आता दोन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अधिक महागाई भत्ता जोडला जाईल. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून प्रभावी मानली जाईल. महागाई भत्त्याच्या वाढीमुळे करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल.
किती वाढणार पगार
१ . जर एखाद्याचे मूळ वेतन ५० हजार रुपये असेल, तर ५३ टक्के DA प्रमाणे त्याला २६,५०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. परंतु आता ५५ टक्के DA प्रमाणे त्यांना २७,५०० रुपये DA मिळेल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
२ . जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन ७० हजार रुपये असेल. तर त्याच्या मूळ पगारावर महागाई भत्ता ३७,१०० रुपये होता. परंतु ५५ टक्के DA प्रमाणे, महागाई भत्ता ३८,५०० रुपये होईल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात १४०० रुपयांची वाढ होईल.
३ . ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १ लाख रुपये आहे त्यांना ५३ टक्के DA प्रमाणे ५३,००० महागाई भत्ता मिळत होता, परंतु आता त्यांना ५५ टक्के दराने ५५,००० रुपये DA मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात २ हजार रुपयांची वाढ होणार आहे.
यापूर्वी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढत होता. परंतु ७८ महिन्यात पहिल्यांदाच महागाई भत्ता केवळ दोन टक्के वाढला आहे. यापू्रवी २०१८ मध्ये महागाई भत्ता दोन टक्के वाढला होता. त्यानंतर सलग तीन ते चार टक्के महागाई भत्ता वाढला होता.