Mazi Ladaki Bahin Yojana: राज्यातील महिलांच्या आरोग्य,पोषण, आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली. 28 जून 2024 रोजी या योजनेस मान्यता देण्यात आली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहेत.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. दरम्यान, आता डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? हा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिले आहेत. राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदेंची विरोधकांवर टीका
विरोधकांवर टीका करतांना शिंदे म्हणले, मी शेतकरी कुटुंबातून येतो. मला गरिबी माहिती आहे. जेव्हा कधी मी सत्तेत जाईन तेव्हा मी माझ्या गरीब बहीण, आई, शेतकरी, भाऊ यांच्यासाठी काहीतरी करेन, असा नेहमी विचार करायचो. याबात मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर आम्ही राज्यात अनेक योजना लागू केल्या. विरोधकांना या गोष्टी पचत नाहीयेत. या निवडणुकीत ते पराभूत होणार आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून या योजनांवर टीका केली जात आहे, असे शिंदे म्हणाले.