सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत आरोप करत वादग्रस्त विधानं केलीय.
पडळकर म्हणाले की, “100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला येतो.” तसेच, पवारांनी धनगर समाज लोकशाहीला मानत नाही, असं वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. मारकडवाडी गाव निवडण्यामागे शरद पवारांचा हेतू धनगर समाजाला बदनाम करणे असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींवर टीका करताना पडळकर म्हणाले, “नरेंद्र मोदींचे खरे चप्पल बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते.” शरद पवारांनाही लक्ष्य करत त्यांनी म्हटलं की, “पवारांची अक्कल आता संपली आहे, आणि त्यांनी निवडणुकांचे प्रशिक्षण घ्यावे.”
ईव्हीएम संदर्भात पडळकरांनी पवारांवर उपहासात्मक टीका केली. त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास दाखवण्याचा आरोप करत विरोध केला आहे.
या सभेत पडळकरांनी जयंतराव पाटील, राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आणि आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा दावा केलाय. आता या विधानानंतर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावे लागणार आहे.