केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारने २०२५ -२६ च्या रब्बी हंगामात 6 पिकांसाठी एमएसपी वाढवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल. सरकारी एमएसपीमध्ये गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.
अहवालानुसार रब्बी हंगाम २०२५ -२६ साठी सरकारने रब्बी पिकांसाठी नवी एमएसपी निश्चित केली आहे. याअंतर्गत गव्हासाठीची एमएसपी १५० रुपये प्रति क्विंटलने वाढवून २,४२५ रुपेय करण्यात आली आहे, जी आधी २,२७५ रुपये प्रति क्विंटल होती. यासोबतच हरभऱ्यावरील एमएसपी 5440 रुपयांवरून 5650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. मसूर डाळींवरील एमएसपी 6425 रुपयांवरून 6700 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. मोहरीवरील एमएसपी 5650 रुपयांवरून 5950 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. त्याच वेळी, करडई पिकावरील एमएसपी 5800 रुपयांवरून 5940 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
एमएसपी काय असते?
एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ती असते जी सरकार शेतकऱ्यांच्या धान्यासाठी निश्चित करते. अगदी सोप्या पद्धतीत म्हटले तर, सरकार ज्या किंमतीला शेतकऱ्यांकडून त्यांचे धान्य विकत घेते त्याला एमएसपी म्हणतात. याचा उद्देश धान्यांची किंमत कमी जास्त झाली तरी शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देणे हा असतो. एमएसपीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीखर्च आणि त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देणे आहे. सरकार दरवर्षी विविध पिकांसाठी एमएसपी जाहीर करते आणि पिकांच्या पेरणीपूर्वी ही किंमत ठरवली जाते. पिकांचा खर्च, उत्पादन खर्च, शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी अशा विविध बाबींचा विचार करून ही आधारभूत किंमत ठरवली जाते.