Dhule News: धामणगाव दुर्घटनेतील मयत पिता-पुत्राच्या वारसांना शासनाची आर्थिक मदत

धुळे:  तालुक्यातील धामणगाव येथील बोरी नदीत वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्रांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती सहाय्य योजनेनुसार प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण ८ लाख रुपयांचे मदतनिधी मंजूर करण्यात आले. आज आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते तहसीलदार यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

कसा घडला होता दुर्दैवी अपघात?

११ ऑक्टोबर २०२४ रोजी धुळे तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी दिनकर लाला पाटील (वय ७५) आणि त्यांचा मुलगा मिलिंद दिनकर पाटील (वय ४०) हे वणी खू. गावच्या शिवारातील शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, बोरी नदीवरील वणी-धामणगाव फरशी पूल ओलांडत असताना दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. कर्ते पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा

घटनेनंतर तातडीने पंचनामा करून शासकीय मदतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. आमदार राम भदाणे यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. अखेर केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांनुसार प्रत्येकी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

मंजुरी पत्र वाटप

आज झालेल्या कार्यक्रमात आमदार राम भदाणे यांच्या हस्ते मंजुरी पत्र मृत दिनकर पाटील यांच्या पत्नी चित्राबाई दिनकर पाटील आणि मृत मिलिंद पाटील यांच्या पत्नी श्रावणी मिलिंद पाटील यांना देण्यात आले.या वेळी धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, माजी पंचायत समिती सभापती विद्याधर पाटील, तसेच मयतांचे वारसदार व नातेवाईक उपस्थित होते.

शासनाच्या मदतीने आधार

या मदतीमुळे मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार असून, या संकटातून सावरण्यासाठी थोडी मदत होईल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने आपत्तीग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणीही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आली.