ढाका : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशमध्ये विद्यार्थी संघटना हिंसक आंदोलन करत आहेत. हिंसक झालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई केली जात आहे. मंगळवारी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत तीन विद्यार्थ्यांसह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले यावरून परिस्थिती किती नियंत्रणाबाहेर आहे, याचा अंदाज येतो.
बिघडलेली परिस्थिती पाहता, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी बांगलादेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तातडीची सूचना जारी केली. यामध्ये देशातील वाढत्या अशांततेमुळे अनावश्यक प्रवास टाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.
बांगलादेशातील विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या आरक्षण पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत प्रवेश मिळण्यास मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. सध्याच्या आरक्षण पद्धतीत सुधारणा करून टॅलेंटच्या आधारे जागा भरण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
ढाका येथे गुरुवारी विविध ठिकाणी विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षानंतर निदर्शने अधिक तीव्र झाली. या हिंसाचारात अनेकजण जखमी झाले. सकाळपर्यंत पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली, असे वृत्त बांगलादेशमधील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततेत होते, परंतु नंतर विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनीही त्यात प्रवेश केला. त्यानंतर विरोधी विद्यार्थी संघटना आणि सत्ताधारी विद्यार्थी संघटना यांच्यात हाणामारी झाल्यानंतर निदर्शनाला हिंसक वळण लागले. मात्र, सत्ताधारी पक्षानेही विरोधकांवर प्रदर्शनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना चिथावणी देत राजकीय स्वार्थ साधल्याचा आरोप केला आहे.
भारत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बांगलादेशातील सर्व नागरिकांना जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यास, भारतीय उच्चायुक्तांकडून सांगण्यात आले आहे. उच्चायुक्ताकडून संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.