सरकारने केला सेमीकंडक्टर, डिस्प्ले फॅब योजनेत बदल

तरुण भारत लाईव्ह न्युज : सरकारने देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकासासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्चाच्या सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. समग्र सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या महत्त्वाच्या उद्दिष्टावर सरकार लक्ष केंद्रित करत असून ते भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती आणि नवोन्मेष परिसंस्थेसाठी उत्प्रेरक ठरेल हे सुनिश्चित करत आहे.  सेमीकंडक्टर परिसंस्था आणि प्रगत नोड तंत्रज्ञानाची मालकी असलेल्या कंपन्यांची मर्यादित संख्या असलेल्या देशांनी दिलेले प्रोत्साहन लक्षात घेऊन कार्यक्रमात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. सेमीकंडक्टर्स, डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आणि संरचना परिसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे हे सुधारित कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीमध्ये भारताच्या वाढत्या अस्तित्वाचा मार्ग सुकर होईल.

उपरोक्त कार्यक्रमांतर्गत भारतात नवीन कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी किंवा विद्यमान कंपन्यांच्या क्षमतेचा विस्तार/आधुनिकीकरण आणि/किंवा वैविध्यीकरणासाठी खालील योजना सुरू केल्या आहेत :

* भारतात सेमीकंडक्टर फॅब्सच्या स्थापनेसाठी सुधारित योजना

* भारतात डिस्प्ले फॅब स्थापन करण्यासाठी सुधारित योजना

 

  • भारतात कंपाऊंड सेमीकंडक्टर्स / सिलिकॉन फोटोनिक्स / सेन्सर्स फॅब / डिस्क्रिट सेमीकंडक्टर्स फॅब आणि सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (ATMP) / OSAT सुविधा उभारण्यासाठी सुधारित योजना

* सेमिकॉन इंडिया फ्यूचर डिझाइन: डिझाइन संलग्न प्रोत्साहन (DLI) योजना

वरील योजनांव्यतिरिक्त, सरकारने मोहाली स्थित सेमी-कंडक्टर प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणाला ब्राउनफिल्ड फॅब म्हणून मंजुरी दिली आहे.