Pan Card Update: केंद्र सरकारने करदात्यांच्या डिजिटल अनुभवात सुधारणा करण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली. या नवीन प्रकल्पासाठी 1,435 कोटी रुपये खर्च केले जातील आणि यामुळे करदात्याच्या नोंदणी सेवांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित बदल शक्य होतील.
भारत सरकारने पॅन 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचे पॅनकार्ड बदलावे लागणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे.
कसे असेल नवीन पॅन कार्ड?
पॅन कार्डची नवीन आवृत्ती नवीन फिचर्सनी सुसज्ज असेल. पण, तुमचा पॅन क्रमांक तोच राहील. या कार्डवर एक QR कोड दिला जाईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल. त्याचा वापर करून आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून त्याचा वापर करणे सोपे होईल. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट केली जातील. यासह पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केले जाईल, जे वापरकर्त्याचा अनुभव सुधारेल. वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल.
नवीन कार्ड कोठे बनवायचे?
केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणतात की, पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना विभागाकडून नवीन पॅनकार्ड पाठवले जातील.