ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट, दगडफेकीत एकाचा मृत्यू

अमोल महाजन

तरुण भारत लाईव्ह न्युज जामनेर : ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागले असून, मतमोजणीनंतर जल्लोष करीत असताना पराभूत उमेदवारांच्या घरावरून दगडफेक झाली. टाकळी खुर्द, ता. जामनेर येथे मंगळवारी दुपारी एकला झालेल्या या दगडफेकीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. धनंजय श्रीराम माळी (वय 35, रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दोन गटामध्येच ही घटना घडली आहे.

तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत एका गटाचा पराभव झाला, तर दुसर्‍या गटाचा विजय झाला. विजयी जल्लोष साजरा करीत असताना दुसर्‍या गटाकडून दगडफेक झाल्याने धनंजय श्रीराम माळी या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला.
विजयी पॅनलचे सर्व उमेदवार मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी येवून त्यांचे स्वागत, सत्कार नगराध्यक्षा साधना महाजन आणि तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केला. त्यानंतर टाकळी खुर्द गावात सर्व विजयी उमेदवार पोहोचले. मंदिरात नारळ फोडण्यासाठी जात असताना पराभूत उमेदवारांच्या घरावरून दगडफेक करण्यात आली आणि त्यात धनंजयचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, इतर पोलीस कर्मचारी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरुन 50 ते 60 जणांंना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.