दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत ; विनेश झाली भावुक, डोळ्यात तरळले अश्रू

दिल्ली  : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिसहून भारतात परतली आहे. दिल्लीच्या IGI विमानतळावर पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा, कुस्तीपटू बजरनाग पुनिया, साक्षी मलिक हेही त्यांचे स्वागत करण्यासाठी आलेहे भव्य स्वागत पाहून विनेशने भावुक होत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे  विनेश फोगाट अपात्र ठरली. दिल्ली विमानतळावरून बाहेर आल्यानंतर तेथे आलेल्या चाहत्यांनी विनेशचे जोरदार स्वागत केले. सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाबाबत, विनेशने सामायिक रौप्य पदक देण्यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडेही अपील केले होते, परंतु 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका CAS ने फेटाळली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन विनेश फोगट जेव्हा मायदेशी परतली तेव्हा तिचे स्वागत पाहून ती भावूक झाली, तर तिने सांगितले की, मी सर्व देशवासीयांचे आभार मानू इच्छिते आणि स्वतःला खूप भाग्यवान समजते. विनेशचे देशात चॅम्पियनप्रमाणे स्वागत झाले आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.

दिल्ली विमानतळाबाहेर विनेश फोगटचे स्वागत करण्यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतर अनेक कुस्तीपटूही उपस्थित होते. याशिवाय विनेशचे कुटुंबीयही उपस्थित होते, ज्यात तिचा भाऊ हरिंदर पुनिया यांनी एएनआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जे लोक कुस्ती आणि खेळाचे चाहते आहेत ते आज विनेशचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आले आहेत. याशिवाय विनेशच्या स्वागताची तयारीही घराघरात सुरू आहे. ती कदाचित ऑलिम्पिक पदक जिंकू शकली नसेल पण तिला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकता यावे यासाठी आम्ही अधिक मेहनत करू. विनेश विमानतळाबाहेर आल्यावर चाहत्यांचे असे स्वागत पाहून तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.