इचलकरंजी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, कर्जबाजारी नातवाने आपल्या मित्रांच्या मदतीने ८२ वर्षीय आजीचा खून केला. पैशांची गरज असल्याने आजीकडे मदतीची मागणी केली असता, नकार मिळाल्याने नातवाने मित्रांसह कट रचून हा क्रूर प्रकार केला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत नातवासह तिघांना अटक केली आहे.
घटनेचा तपशील
गणेश राजाराम चौगले (वय २२, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे अटकेतील नातवाचे नाव असून, त्याच्या साथीदारांमध्ये नरेश ऊर्फ नरेंद्र दगडू करपे (वय २५, विक्रमनगर, इचलकरंजी) आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.
सगुणा तुकाराम माधव (वय ८२) या आपल्या भोई गल्ली, इचलकरंजी येथील घरी एकट्याच राहत होत्या. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नातवाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, आजीने मदतीस नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मित्रांच्या मदतीने खूनाचा कट रचला.
काल दुपारी गणेश त्याच्या दोन मित्यांसह आजीच्या घरी गेले. त्याने आजीकडे पैशांची मागणी केली. आजीने नकार दिल्याच्या रागातून त्यांनी आधी तिचा गळा दाबला आणि त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटून ठार केले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने – पाटल्या, कर्णफुले असे एकूण चार तोळे सोने लुटून तेथून फरार झाले. घराचे कुलूप लावून आरोपींनी पोबारा केला.
हेही वाच : घरात लहान भावाचा तिलक समारंभ सुरू अन् मोठ्या भावाने घेतला गळफास; कारण ऐकून सर्वच थक्क
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?
रात्री साधारण सव्वाआठच्या सुमारास सगुणा माधव यांच्या सुनेने त्यांना जेवण देण्यासाठी घरी भेट दिली. मात्र, दरवाजाला कुलूप पाहून तिला संशय आला. तिने पती पुंडलिक माधव यांना ही माहिती दिली. त्यांनी कुलूप तोडून दरवाजा उघडला असता, सगुणा माधव यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांचा मुलगा सुशांत माधव यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात खूनाची फिर्याद नोंदवली.
पोलिसांची कारवाई
खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला. संशयित गणेश चौगले आणि त्याच्या मित्रांना ट्रॅक करून इचलकरंजी शहरातून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
कर्जबाजारीपणामुळे जीवघेणा निर्णय
गणेश चौगले हा कर्जबाजारी होता. त्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे घरही विकले होते. मात्र, तरीही त्याच्या आर्थिक अडचणी सुटल्या नाहीत. त्यामुळे त्याने पैशांसाठी आजीकडे मागणी केली होती. आजीने नकार दिल्यावर तो टोकाची पावले उचलत हत्या आणि चोरी यासारख्या गुन्ह्यात अडकला.