जळगाव : रेशन दुकानातून स्वस्त धान्याचे जनतेला वितरित केले जाते. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर रेशन दुकानदारांना त्यांचे कमिशन तत्काळ अदा न केल्यास संबंधित पुरवठा अधिकारी, वितरण अधिकारी यांना जाबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाईचा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे देण्यात आला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाने धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विटल 150 रुपये जाहीर केले आहे. परंतु, धान्याचे वाटप केल्यानंतर देखील दुकानदारांना कमिशन मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. याची अन्न. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दखल घेतली आहे. गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. या धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे. कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी होती. दरम्यान, शासनाकडून धान्य वितरणाचे कमिशन अदा करण्यात आले आहे. तथापी जिल्हा व परिमंडळ स्तरावरून कमिशन अदा करण्यात येत नाही किंवा विलंब केला जातो. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पत्रकातून जिल्हा पुरवठा अधिकार्यांचे लक्ष वेधले आहे.