तरुण भारत लाईव्ह ।२९ डिसेंबर २०२२। : धरणगाव शहरातील उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाने बुधवारी छापेमारी केली . यामुळे जिल्ह्यातील राजकीय तथा व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, छापेमारीत काय हाती लागले याबाबत माहिती कळू शकली नाही.
नाशिक येथील केंद्रीय जीएसटीच्या पथकाने जीएस उद्योग समूहाच्या मुख्य ऑफिसवर आणि दोन जिनिंग, दोन फॅक्ट्री इथे एकाच वेळी छापेमारी केली. साधारण 15 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी सकाळी 10 दहा वाजता तीन वाहनांमधून गावात धडकले. यावेळी त्यांनी आल्याबरोबर दोन्ही फॅक्ट्री सील केल्या. त्यानंतर त्यांनी जीएसटीशी निगडीत कागदपत्र तपासले.
पथकाने मार्केट कमेटीशी निगडीत कागदपत्र देखील तपासली. मार्केट फी वेळेवर भरली आहे का?, याची पथकाने जीएस उद्योग समूहाच्या खाजगी मार्केटची तपासणी केली असता त्यांना 2012 पासून तर डिसेंबर 2022 पर्यंत सर्व मार्केट फी भरली असल्याचे आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती.