जळगाव : त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गी लावल्याने हातपंप दुरुस्ती देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटनेतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४ या कालावधीतील शासनाकडे पाठपुरावा केला होता. तथापी ४६ वर्ष लढा देवुनही या कर्मचा-याना शासनाकडुन न्याय मिळालेला नव्हता. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्य पूर्वक ऐतिहासिक निर्णय घेवून राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील हातपंप/विजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गातील १०७४ कर्मचाऱ्यांच्या वेतन/निवृत्तीवेतनाचा खर्च रु. ४५.९१ कोटी चे शासनाने दायित्व स्वीकारण्या बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील १०७४ कर्मचाऱ्यांचा वेतन व भत्यांचा जिल्हा परिषदेवरील भार कमी होऊन सदरील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते जिल्हा परिषदेमार्फत वेळेवर अदा करणे शक्य होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऐतिहासिक निर्णयाद्वारे वचनपूर्ती केल्याने त्यांचे हातपंप व वीजपंप देखभाल दुरुद्ती कर्मचारी संघटना यांनी आभार मानले आहे.
राज्यातील हातपंप, वीज पंप देखभाल दुरुस्तीसाठी राज्यातील १०७४ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हातपंप दुरुस्ती देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी संघटनेचे शेख सत्तार, अतुल कापडे, एस.टी. सूर्यवंशी, वाय.जी. पाटील, एस.एल. महाजन, आर. एस. झटकर, आर. पी. देशमुख, एल.एस. एडके, डी. डी. सैंदाणे, डी. के. बोरोले, लहू पाटील, गलू कोळी, एस.एम. पाटील, जी .एस. माहोर, श्री पाचपोळ, राजू मिस्तरी, एस. पी. पाटील, श्री. भावसार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.