मुंबई । महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यातच आता शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नाराजीनाट्य सुरु झालंय. एकनाथ शिंदेंचं नाव निमंत्रण पत्रिकेवरुन नसल्याने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय.
मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.
निमंत्रण पत्रिकेवर नेमकं काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाबी रंगाची पत्रिका छापून त्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव छापलं आहे. एकनाथ शिंदेंचं नाव त्यांच्या पत्रिकेवर नसल्याने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
गुलाबराव पाटील म्हणाले की, ”ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो त्यांचं नाव नाही, असं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. राष्ट्रवादी आमचा एक घटक आहे. तीन पक्ष आहेत. नावाचा उल्लेख असायला हवा होता. पण आता ती वेळ नाही. पुढच्या काळात अशी चूक होऊ नये असं त्यांनी पथ्य पाळावं.” अशा शब्दात गुलाबराव पाटील व्यक्त झाले.