तरुण भारत लाईव्ह न्युज : भुसावळ येथे गुरांची अवैध वाहतूक करणार्या मॅटेडोअरला पकडण्यात आले असून, त्यात तीन गुरे मृत, तर चार गोर्हे हे जिवंत आढळले. हे वाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस कर्मचार्याने पकडले. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पांडुरंग टॉकीजजवळ सकाळी अकराला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी विजया सपकाळे आपले कर्तव्य बजावित असताना जामनेरकडे एक मॅटेडोअर फुल भरुन जात होता. त्याला थांबविण्याचा इशारा केला होता. मात्र त्याने गाडी वेगाने पळविली. महिला कर्मचार्याने मोटारसायकलने या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याने वाहनचालकाने गाडी महामार्गावर वळविली. ही गाडी हॉटेल शेरेपंजाब जवळ हळू झाली असता विजया सपकाळे यांनी गाडी अडवली. त्यावेळेस वाहतूक शाखेचे प्रदीप पाटील यांनी मदत केली. गाडीची कागदपत्रे मागितली व गाडीत काय आहे याची चौकशी केली. वाहनचालक व क्लिनर गाडी सोडून पसार झाले. महमार्गावर वाहतूक कर्मचार्यांनी गाडी पकडल्याची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सपोनि स्वप्नील नाईक यांना माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हा मेटाडोअर विना क्रमांकाचा असून, त्यात पुढच्या बाजुला गुरे तर मागे कुट्टीची पोती ठेवलेली होती. हे वाहन डीवायएसपी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याबाबत पो. कॉ. विजया सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनी गणेश मुहे करीत आहे.