अपघातग्रस्त वाहनात आढळला गुटखा, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ अपघातग्रस्त बोलेरो वाहनातून 9 लाखांचा गुटखा नरडाणा पोलिसांनी जप्त केला. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.30 डिसेंबर रोजी रात्री 2.25 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नरडाणा पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील, यांना धुळ्याकडून शिरपूरकडे एका बोलेरो वाहनातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी पथकास कारवाईच्या सुचना केल्या. दि.30 डिसेंबर रोजी रात्री 2.25 वाजता पथकाने गोराणे फाट्यावर पाळत ठेवली. मात्र, या वाहनाचा गोराणे फाट्याच्या अलीकडेच अपघात झाला. पथकाने जावून बघितले असता संशयित बोलेरो वाहन (क्र.एम.एच.48/ए. जी.0315) रस्त्याच्या कडेला उलटलेले दिसले. चालकाकडे वाहनात काय आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

परिणामी, पथकाने या बोलेरो वाहनाची तपासणी केली. या तपासणीत प्रतिबंधीत गुटखा व तंबाखुचा साठा पथकाला आढळून आला. यात 7 लाख 77 हजार 920 रूपये किंमतीचे विमल पानमसाल्याचे 4 हजार 160 पॅकेटस, 1 लाख 37 हजार 280 रूपये किंमतीचे प्रतिबंधीत तंबाखूचे 4 हजार 160 पाकिटे असा एकूण 9 लाख 15 हजार 200 रूपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता.

या कारवाईत विकास गुलाब कनोजे रा. आंबा, ता.शिरपूर, याला ताब्यात घेण्यात आले असून तीन लाखाच्या बोलेरो वाहनासह एकूण 12 लाख 15 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नरडाणा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून विकास गुलाब कनोजे याच्याविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि चंद्रकांत पाटील करीत आहेत.