मुक्ताईनगर शहरात आमदारांनी पकडला पाच लाखांचा गुटखा

मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांकडून कारवाई केली जात असतानाही गुटखा तस्कर छुप्या पद्धतीने खाजगी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील गुटख्याची तस्करी करणारे वाहन जप्त करीत ते पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आणले. या वाहनातून पाच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित मोहम्मद आमीर मोहम्मद हनीफ (खडका रोड, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशय आल्यानंतर अडवले वाहन

सोमवारी सकाळच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील हे चारठाणा येथे जात असताना आमदारांच्या सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांना एका वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी वाहन अडवल्यावर त्यात गुटख्याची तस्करी होत असल्याचे आढळल्यानंतर आमदारांनी होंडा सिटी वाहन (एम. एच.०२ बी.एम. ८४२५) हे पोलीस उपअधीक्षक कार्यालयात जमा केले.

या वाहनातून चार लाख ९८ हजार १०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला तसेच सात लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली. मध्य प्रदेशातून हा गुटखा भुसावळात आणला जात असताना ही कारवाई करण्यात आली. मुक्ताईनगर येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल विजय कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख (खडका रोड भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.