भारतातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटल्यानंतर गयानाचे पंतप्रधान ब्रिगेडियर मार्क अँथनी फिलिप्स यांनी दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, गयाना कोणत्याही दहशतवादी कृत्याचा निषेध करतो. आमचा असा विश्वास आहे की, प्रत्येक राष्ट्राला शांततेत राहण्याचा आणि स्वरक्षणाचा अधिकार आहे. आम्ही कायद्याचे राज्य पाळण्यावर विश्वास ठेवतो.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत गयानाचे उपराष्ट्रपती भरत जगदेव आणि पंतप्रधान मार्क फिलिप्स यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला आपला पाठिंबा असत्याचे स्पष्ट केले. बैठकीनंतर जॉर्जटाऊनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, शिष्टमंडळाने गयानाचे उपराष्ट्रपती डॉ. जगदेव यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल करार यावरील भारताची भूमिका सविस्तरपणे मांडली आणि दहशतवादाविरुद्ध भारताचे शून्य सहनशीलतेचे धोरण अधोरेखित केले. उपराष्ट्रपतींनी दहशतवादविरुद्ध भारताच्या लढाईत गयानाच्या अटळ पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.
गुंतवणुकीवर व्यापक चर्चा : शशी थरूर
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे शशी थरूर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, गयानाच्या नेतृत्वासोबतची बैठकीत दहशतवादावर व्यापक चर्चा झाली. यावेळी तेल आणि वायू शोधाच्या मुद्यावर देखील चर्चा झाली. शेती, दूरसंचार, बैंकिंग आणि महामार्ग विकास यात भारतीय कंपन्यांसाठी असलेल्या संधींवरही चर्चा झाली. गयानामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे गयानामध्येही भारतीय कामगारांसाठी संधी आहे. भारतीय शिष्टमंडळाने गयानाच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभालाही हजेरी लावली.