जळगावात मोकाट कुत्र्यांची हैदोस; 3 वर्षीय चिमुरड्यावर हल्ला, एकुलता एक मुलगा गंभीर जखमी, कुटुंबियांचा आक्रोश!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । अंगणात खेळत असताना, तीन वर्षीय बालकावर एकाच वेळेस आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क परिसरात गुरुवारी, २२ रोजी  सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. मोहंमद फैज (वय ३) असे जखमी बालकाचे नाव असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शहरातील उस्मानिया पार्क विस्तारित परिसर आहे. या भागातून लेंडीनाला वाहतो. नवीन वसाहत असल्याने नाल्याच्या काठावर मोकाट कुत्र्यांचा दिवसभर वावर असतो. गुरुवारी सदर बालक घराजवळ अंगणात खेळत असताना, आठ ते दहा कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. बालकाच्या दोन्ही मांड्या, कंबर, पाठ, छातीसह हातांवर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबियांनी त्याला घेऊन जिल्‍हा रुग्णालय नेले.

रुग्णालयात तब्बल दोन तास त्याची तपासणी केल्यानंतर बालकाच्या किडण्यांनाही इजा झाल्याचे डॉक्टरांना तपासणीत आढळून आले. डॉक्टरांनी ४८ तासांसाठी बालकाला निरीक्षणाखाली ठेवले आहे. एकुलता एक मुलगा गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता.