हम्पी : हिंदू अभिमान बिंदू ! वर्षातील आठ महिने हिरवागार प्रदेश

बडवलिंग मंदिर म्हणजे एकाच दगडातून कोरून काढलेले महाकाय शिवलिंग होय. हम्पी येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरांच्या बाजूलाच असलेले एक शिवलिंग एवढीच या शिवमंदिराची ओळख मर्यादित नाही, तर खरी ओळख ही ‘कृष्णभट शास्त्री’ यांच्यामुळे आहे. बडवलिंग हे एका गरीब स्त्रीने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून उभारलेले हम्पीस्थित शिवालय आहे. जवळजवळ तीन मीटर उंची असलेल्या या शिवलिंगाच्या खालच्या भागात बाराही महिने पाणी असते.

या शिवलिंगाची पूजाअर्चा करण्यासाठी कृष्णभटांची नेमणूक करण्यात आली. वार्षिक २५ किलो तांदूळ आणि ३०० रुपये महिना या अतिशय तुटपुंज्या मानधनावर त्यांनी ४० वर्षे या मंदिराला निष्ठापूर्वक सेवा दिली. २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.समाजमाध्यमांवर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिवलिंगाची पूजा करतानाचे फोटो प्रसारित झाले. या भागात अशा अढळ धर्म श्रद्धा असलेली अनेक माणसं आजही आहेत आणि मुद्दा निष्ठेने एखादे कार्य आयुष्यभर करीत राहण्याचा आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. ही हिंदू धर्म निष्ठा, हिंदू कलाविष्काराच्या रूपाने ठाई ठाई उजागर होते ती जागा म्हणजे हम्पी; विजयनगर साम्राज्याची राजधानी! प्रचंड मोठे दगड आणि त्याचेच डोंगर आणि तरीही वर्षातील आठ महिने हिरवागार असलेला प्रदेश.

या मोठाल्या शिळांमध्ये त्या शिळांचा अतिशय सुयोग्य वापर करीत वसलेले शहर हम्पी. ४०० वर्षे हिंदू राजांनी राज्य केलेले, संगम राजघराण्याने वसवलेले शहर म्हणजे हम्पी. या साम्राज्याच्या समृद्धीच्या अनेक खुणा आजही अंगाखांद्यावर मिरवणारे हे शहर! त्यांच्या शासन काळातील अनेक घडामोडी, राजकीय वळणं, घटना, क्रौर्य, शौर्य, कटकारस्थाने, लढाया आणि मोहिमा, प्रथा परंपरा यांच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवताना त्यावेळच्या वैभवाची साक्ष देत असतात.  मुळात हे विजयनगरचे राज्य म्हणजे हिंदूंनी प्राणपणाने इस्लामच्या विरोधात दिलेला यशस्वी लढा आहे. मुसलमानी सत्ता उलथून टाकून हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी त्याही काळात हिंदूंना ५० वर्षांपेक्षा जास्त काळ झगडावे लागले. कारण १२ व्या-१३ व्या शतकात सुरू झालेल्या मुसलमानी आक्रमणाने उत्तर हिंदुस्थान व्यापला गेला होता. उत्तरेत मुस्लिम सत्तेला कोणतेही आव्हान उरलेले नव्हते. अर्थातच इस्लामला दक्षिण हिंदुस्थान खुणावत होता.

संपत्तीच्या मोहाने अल्लाउद्दीन खिलजी तेथे चालून गेला. मात्र, भौगोलिक अंतर लक्षात घेत दक्षिणेच्या सत्तांवर त्याने फक्त खंडणी लावली. तेथे आपला अंमल बसवण्याच्या फंदात तो पडला नाही. इस्लामिक आक्रमणाविरोधात दक्षिणेतील लहान-मोठ्या राजांनी एकत्र येऊन मुस्लिम राजवटीला थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४०० वर्षे पाय रोवू न देण्याची अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे; ती याच विजयनगरच्या हम्पी या राजधानीतून ! पाच भावांनी विजयनगरच्या हम्पीला मध्यवर्ती स्थान देत इस्लामी सत्तांच्या छाताडावर नाचत येथे अभिमानपूर्वक हिंदू सत्ता स्थापन केली, नव्हे भरभराटीला आणली आणि या संघर्षाच्या शेवटी हिंदू संस्कृती राखण्यासाठी विजयनगरच्या शेवटच्या राजाच्या काळातच एका अत्यंत धोरणी, शूर अशा सरदाराचे आगमन या इतिहासाच्या सारीपाटावर झाले; ज्याच्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा यशस्वी होत त्याची अखेर मराठ्यांचे राज्य स्थापन होण्यात झाली. तो सरदार म्हणजे ‘

शहाजीराजे भोसले’ होत, असं जयंत कुलकर्णी आपल्या ‘विजयनगर उदयास्त’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात.इथे हरिहर बंधूंनी विजयनगरच्या हम्पीला मध्यवर्ती स्थान देत, तुंगभद्रा नदीचा नैसर्गिक संरक्षणासाठी वापर करीत, इस्लामी सत्तांच्या छाताडावर नाचत येथे अभिमानपूर्वक हिंदू सत्ता स्थापन केलेले हे राज्य. सतत ४०० वर्षे चार हिंदू राजकुळांनी इथे सत्ता राबवली. पहिले संगम, दुसरे सालूव, तिसरे तुलूव, चौथे अरविडु. पण विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी कशी झाली ते पाहणेदेखील हिंदू समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणारे आहे. विजयनगर निर्माण कसे झाले यासंबंधी अनेक आख्यायिका, मतमतांतरे आहेत. विविध अभ्यासकांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यामुळे निश्चित असे काहीही सांगता येत नाही आणि उपलब्धदेखील नाही. परंतु, अल्लाउद्दीन खिलजी खंडणी लावून दिल्लीला परत गेला. त्याने आपला विश्वासू सरदार मलिक कफूरला दक्षिणेत ठेवले. पण या इस्लामिक आक्रमणामुळे येथील राजा बल्लाळदेव अस्वस्थ झाला होता.त्याने आपल्या मुलाला गादीवर बसवले आणि स्वतः इस्लामिक आक्रमणाविरोधात सैन्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत राहिला. मुस्लिम आक्रमकांची ताकद लक्षात घेऊन त्याने हरिहर आणि बुक्का या आपल्या अधिकारी बंधूंपैकी हरिहर याला नायक केले.

तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशात काही छोटी छोटी राज्ये अस्तित्वात होती. या हरिहर बंधूंनी या सगळ्या राज्यांचे एक संघराज्य निर्माण केले आणि इस्लामी आक्रमण रोखण्यात यश मिळविले. त्यांनी दक्षिण भारतातील फक्त इस्लामिक आक्रमणच रोखले नाही तर आपल्या पूर्वसूरींशी असलेले नातेदेखील जपले. हे नाते जपणं याचा अर्थ, हिंदू संस्कृती, हिंदू जीवनदृष्टी, हिंदू जीवनपद्धती, हिंदू कलाविष्कार या सगळ्या गोष्टींची जोपासना करणे, संवर्धन आणि विकास करणे, हा होतो. हिंदू समाजाची सर्वसमावेशकता आजही भग्नावस्थेत असलेल्या हम्पी येथील शिल्पांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. येथे जशी शिवलिंग आहेत तशीच विष्णू, श्रीराम, गणपती, महिषासुरमर्दिनी, वराह, गरुड अशी विविध देवतांची शिल्पं आणि मंदिरेदेखील आहेत.

जसे लक्ष्मी नरqसह मंदिर आहे तसेच विठ्ठल आणि श्री रामाचे मंदिरदेखील आहे. त्याच वेळी काही शिल्प, तुर्क व पोर्तुगीज माणसांची आहेत. हे हिंदू संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचे दर्शन करवणारे आहे. येथील प्रत्येक गुंफा, मंदिर, मंदिरांची आवारं आणि शिखरे सगळेच हिंदू विचारांची व्यापकता आणि भव्यता दाखवणारे आहे.त्याच वेळी इस्लामिक आक्रमकांची सगळं उद्ध्वस्त करण्याची मानसिकतादेखील दिसून येते. प्रत्येक मूर्तीवर किंवा शिल्पावर झालेला आघात हा आविष्कार स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोप करणारा होता आणि आहे हे निश्चित.इस्लामची ही मानसिकता आम्ही काही वर्षांपूर्वी बमियान येथील बुद्ध मूर्ती तोफांच्या साहाय्याने उडवली, तेव्हादेखील अनुभवली आहे. म्हणजे मागील हजार वर्षांत इस्लामच्या

मूलभूत दृष्टिकोनात, मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही, असाच निष्कर्ष काढावा लागतो. हिंदूंनी मात्र आपलं हिंदुत्व सोडायचं नसतं. कारण जगात असलेले, नसलेले, वैचारिक, ऐहिक, पारमार्थिक, वैज्ञानिक, भव्य, दिव्य असं ज्ञान आणि तत्त्वज्ञान हीच हिंदुत्वाची ओळख असते. आपल्या हरवलेल्या प्रत्येक बाबींचे कालसुसंगत पुनर्निर्माण करण्याचा ध्यास हिंदू समाजाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही असा विचार केला पाहिजे. या देशात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माने फक्त विध्वंसच केला, हे सत्य जगासमोर आलेच पाहिजे. ते इतिहास आणि पुरातत्त्व दोन्ही आघाड्यांवर मांडलं जाणं आवश्यक आहे. खरं तर आजही हम्पी बघणे, विजयनगर बघणे, तेथील मंदिरं बघणे हा मुद्दा नसून ते गतवैभव अनुभवणे हा मुद्दा आहे. एखादं मंदिर का बांधले गेले? त्या मागचा इतिहास, आणि उद्देश समजून घेत जर हा प्रदेश अनुभवला तर प्रत्येक हिंदू माणसाचा ऊर अभिमानाने भरून यायलाच हवा. हा अभिमानही हिंदुत्वाचा, हिंदू असण्याचाच असेल हे निश्चित !

 डॉ. विवेक राजे

९८८१२४२२२४