शहरात रस्त्यांवरील हातगाड्या व रस्त्याच्या किनार्यावर किरकोळ वस्तू विक्री करणार्यामुळे अतिक्रमणात वाढ होत होती. याबाबत काही नगर सेवकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी होत होत्या. याबाबत गेल्या महासभेत नगरसेवकांनी या विभागालाच दोषी ठरविले होते. अतिक्रमण विभागाला हॉकर्सकडून आर्थिक लाभ होतो, असा आरोपही अनेकदा करण्यात आला होता. त्यावरून शहरातील प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सधारकांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता सरळ या रस्त्यांवर उभे राहणार्या हॉकर्सवर कारवाई होणार आहे.
शहरात रस्त्यांवरील हॉकर्सच्या होणार्या अतिक्रमणाला नागरिकांसह पदाधिकारी देखील कंटाळले होते. याबाबत 7 जुलैला झालेल्या महासभेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. नगरसेविका दीपमाला काळे यांनी कोर्ट ते गणेश कॉलनी चौक या रस्त्यावर असलेल्या हातगाड्या, भाजी विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करूनही मार्ग निघत नाही. तेथील भाजी विक्रेत्यांना पेट्रोल पंपाशेजारी हक्काची जागा दिली होती. सायंकाळी वाहतूक सुरू असताना रस्त्यावर हातगाड्यांद्वारे विक्रीते भाजी विक्री करतात, असे निदर्शनास आले होते.
त्यावरून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काही दिवसांपूर्वीच शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमित हॉकर्सधारकांना सूचना दिल्या होत्या. यानंतर न ऐकणार्या अतिक्रमित हॉकर्सधारकांवर कारवाई करीत सुमारे 10-12 टॅक्टर भरून हातगाड्या, टपर्या असा सामान या विभागाने जप्त केला होता.